-----------------------------------------------------------------------------------------------
स्वतंत्र भारत पक्षाची लोकसभा निवडणूक २०१४ साठी भूमिका
स्वतंत्र भारत पक्ष हा देशातील एकमेव स्वतंत्रतावादी पक्ष आहे. या पक्षाने तयार केलेला जाहीरनामा देशातील सर्व प्रश्नांचा विस्तृतपणे विवेचक उहापोह करणारा आहे एवढेच नव्हे तर त्याचे अंतरंग सुसंगतीने परिपूर्ण आहे. मात्र, आजघडीला आपल्याला असे दिसते आहे की देशातील कोणताच पक्ष, स्वतंत्र भारत पक्ष या जाहीरनाम्याच्या माध्यमाने देशापुढे ज्या प्रकारची स्वतंत्रतावादी कार्यक्रमपत्रिका ठेवतो आहे त्याचा पाठपुरावा करण्याच्या भूमिकेत नाही आणि बहुसंख्य जनताही स्वतंत्र भारत पक्षाच्या दृष्टीचा स्वीकार करण्याइतपत तयार नाही. उलट, सर्वच पक्षांची पावले सरकारी खजिन्याची लूट करून गरीब, भुकेले व अल्पसंख्याकांना उपकृत करून तसेच ग्रामीण समाजातून परागंदा होऊन शहरांच्या सीमेवर लटकलेल्या अर्धनागरी वर्गांच्या ('Rurban classes') गरजा भागवून त्या सर्वांची मर्जी संपादन करण्याच्या दिशेने अहमहमिकेने पडत आहेत.
या परिस्थितीत स्वतंत्र भारत पक्ष २०१४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकांपासून दूर रहाण्याचा निर्णय घेत आहे. मात्र, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांची इच्छा असल्यास, त्यांच्या पसंतीच्या पक्षाच्या आधाराने निवडणूक लढविण्यास आणि अश्या तर्हेने निवडणूक लढविणार्या कार्यकर्त्यास शक्य होईल त्या मार्गांनी मदत करण्यास मुक्त असतील.
असे असले तरी, स्वतंत्र भारत पक्ष स्वतंत्रतावाद्याच्या 'लिबरल अलायन्स'चा सदस्य म्हणून सक्रिय राहील आणि देशाला स्वतंत्रतावादी कार्यक्रमपत्रिका स्वीकारणे अपरिहार्य आहे हे देशाने लवकरात लवकर स्वीकारावे यासाठी शर्थीने प्रयत्न करीत राहील.
(शरद जोशी)
राष्ट्रीय अध्यक्ष,
स्वतंत्र भारत पक्ष
-----------------------------------------------------------------------------------------------