संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
सन २०१५. दिनांक ३ सप्टेंबर. शेतकरी संघटनेचे प्रणेते आणि शेतकर्यांचे पंचप्राण शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस. एक अलौकिक जीवनप्रवास. एक खडतर जीवनगाथा. दुर्दम्य इच्छाशक्तीचा चढता आलेख. भौतिक विज्ञानातील अशक्यप्राय शोधाची विजयगाथा. आणि, पस्तीस वर्षांपूर्वी संस्थापित शेतकरी संघटनेच्या ज्वलंत इतिहासाचा प्रेरक उद्गाता.
यापूर्वी एका वाढदिवसाच्या प्रसंगी महामानव स्वामी विवेकानंद आणि शरद जोशी यांच्या वाटचालीतील साम्य दाखवण्याचा मोह मला आवरता आला नव्हता. आज पुन्हा, नास्तिक असलेल्या युवक नरेंद्रचे रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून उच्च स्थानी विराजमान झालेले विवेकानंद रूपांतर आणि जीवनातील सर्व भौतिक साधनांची उपलब्धता जाणीवपूर्वक अव्हेरून हालाखीचे जीवन स्वीकारून जगाच्या अर्थशास्त्राला कृषिकेंद्रित वेगळे परिमाण देणारे अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांच्या जीवनप्रवासांतील साम्य मला उल्लेखनीय वाटू लागते.
'शेतकर्यांचं शोषण न होता जलद आर्थिक विकास होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी हा लढा आहे. महात्मा फुले यांनी शेतकर्यांच्या आसुडाविषयी जे सांगितले त्यामध्ये आणि आज मी जे काही सांगतोय त्यामध्ये काहीही फरक नाही. फक्त फुल्यांच्या नंतर हा विचार प्रथमच पुढे येतो आहे आणि मी तो अर्थशास्त्रीय परिभाषेत मांडतो आहे. एक ऐतिहासिक महत्त्वाचा लढा आपण लढतो आहोत. यामधून जगाच्या आर्थिक जडणघडणीला नवी दिशा मिळणार आहे' या, शेतकरी संघटना स्थापनेच्या सुरुवातीला शरद जोशी यांनी आत्मविश्वासाने मांडलेल्या विचारांची प्रचीति आपण घेतली आहे. आणि स्वतः एक जीवनव्रती होऊन,
'की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे'
या निष्ठेने संघटना पाईकांना या खडतर वाटेवर पुढे घेऊन जाण्याचे ऐतिहासिक कार्य या नेतृत्वाने अवलंबिले आहे. आता शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन आणि समाजाची बधीरता कधी संपणार हे सांगणारा संघटना विचार यांची पुनर्मांडणी आणि त्यासाठीचा कृतिकार्यक्रम नव्याने आखून अवलंबिण्याची आवश्यकता आहे.
काय दिले आम्हाला शरद जोशींनी? सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. आमच्या घामाच्या दामाच्या हक्काची जाणीव आणि त्याच्यासाठी लढण्याची शक्ती दिली. सर्वसामान्य शेतकर्याला स्वातंत्र्यलढ्याची ऊर्जा दिली. १९८० नंतरच्या दोन दशकांतील संघटनेच्या लढ्यातील ते मंतरलेले दिवस आठवतात. संघटना पाईकांनो! आपण भाग्यवान की शरद जोशी यांच्या प्रेरणेमुळे दुसर्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या काळात देशभक्तांना स्वातंत्र्य मागणीसाठी लाठीमार सोसावा लागला, छातीवर बंदुकांच्या गोळ्या झेलाव्या लागल्या, तुरुंगवास भोगावा लागला; भूमिगत राहून काम करावे लागले. सभाबंदी, भाषणबंदी, जमावबंदी या सर्वांना सामोरे जावे लागले. अगदी त्याचप्रमाणे या दुसर्या, आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यात या सर्व छळांना आम्हाला सामोरे जावे लागले आहे. सत्तांध हे परकीय असोत की स्वकीय असोत, एकाच वृत्तीने वागतात, सारखेच अन्यायी असतात याचा अनुभव आपणही घेतला आहे.
गेल्या १५-२० वर्षांत एक 'बालगंधर्व' हा चित्रपट सोडल्यास मी चित्रपटगृहात किंवा घरी दूरदर्शनवर पूर्ण चित्रपट पाहिलेला नाही. परंतु या ऑगस्ट महिन्याच्या एका रविवारी घरी दूरदर्शनवर लागलेला 'लोकमान्य - एक युगपुरुष' हा चित्रपट, घरीच असल्यामुळे, जवळपास पूर्ण पहाण्याची संधी मिळाली. इंग्रजांच्या सत्तेविरुद्धचा टिळकांचा तत्कालीन लढा व प्रसंग यांचे चित्रण परिणामकारकरित्या या चित्रपटात आले आहे. आणि त्याच वेळी आजच्या काळातील एक तरूण की जो शेतकर्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांमुळे अस्वस्थ आहे, शेतकरी आंदोलनाच्या विचाराने भारावला आहे त्याचे चित्रण आहे. चित्रपट हा काही माझा आवडीचा किंवा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे फावल्या वेळात मी पाहिलेल्या त्या चित्रपटावरून निर्मात्याचा त्या दोन लढ्यांतील मांडणीचा उद्देश मला नीट अभ्यासता आला नाही. शरद जोशी यांनी उभारलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या या लढ्यात स्वकीयांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या शेतकरी संघटना पाईकांची उध्वस्त कुटुंबे, आत्महत्येच्या टोकावर पोहोचलेला शेतकर्याचा जीवनप्रवास आणि लाठीमारात अपंग झालेल्यांचे दु:ख या निर्मात्याने जर का बारकाईने पाहिले, अभ्यासले असते तर ते अधिक परिणामकारकपणे मांडले गेले असते, असे वाटते. तथापि, परकीय सत्तेविरुद्धचा राजकीय स्वातंत्र्याचा लढा आणि स्वकीय सत्तेविरुद्धचा आर्थिक स्वातंत्र्याचा लढा यांची तुलनात्मक मांडणी करण्याचा निर्मात्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलनाला वेगळे परिमाण देणारा ठरतो.
साहित्य, चित्रपट, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या नेतृत्वाखाली होणारी शेतकरी आंदोलने यांच्या माध्यमांतून शेतकर्यांचे प्रश्न मांडण्याचे, काही अंशी प्रश्न सोडविण्याचा आभास निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात दररोज शेतकर्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. शेतकर्याचे दारिद्र्य वाढत चालले आहे. त्यामुळे या सर्व प्रयत्नांतील मर्यादाही स्पष्ट होत आहेत. चार आंधळ्यांनी हत्तीचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यासारखाच हा प्रकार आहे. त्यासाठी कुणी डोळसाने हत्तीचे समग्र चित्र स्पष्ट करण्याची गरज अटळ आहे. भारतीय शेतकर्याच्या दारिद्र्याचे मूळ आणि शेतीव्यवसायाचे परावलंबी स्वरूप यासंबंधीचे अचूक निर्देश व मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ शरद जोशी यांनी सांगितलेल्या विचारातच आहे हे स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्यानंतर शेतकर्यांचे प्रश्न सुटतील या मृगजळावर शेतकरी जगले. परंतु, इंग्रजांनी उभी केलेली शोषणव्यवस्था स्वातंत्र्यानंतरही पद्धतशीरपणे जोपासली गेली एवढेच नव्हे तर अधिकाधिक क्रूरतेने राबविली गेली. शेतकर्यांच्या रास्त भावाच्या मागणीच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचे शासकीय प्रयत्न म्हणजे या शोषणव्यवस्थेला टिकवून धरण्याचेच प्रयत्न आहेत. हा क्रूर डाव शरद जोशी यांनी विचार आणि आंदोलनामधून शेतकर्यांच्या लक्षात आणून दिला हे त्यांचे महान कार्य आहे. म्हणूनच ते स्वातंत्र्यानंतरचे सर्वश्रेष्ठ क्रियाशील विचारवंत ठरतात. शेतकरी संघटना कार्याच्या सुरुवातीच्या काळात, केंद्र सरकारात अकरा वर्षे शेतकीमंत्री म्हणून काम केलेल्या अण्णासाहेब शिंदे यांनी 'शरद जोशींनी मांडलेला विचार योग्य असल्याचे' सांगून 'कृषि मूल्य आयोग नेमल्यानंतर शेतकर्यांचा प्रश्न सुटेल; योग्य तर्हेने शेतीमालांचे उत्पादनखर्च काढले जातील आणि शेतीमालाला योग्य भाव मिळतील अशी आम्हाला आशा वाटली होती. परंतु, शेतकर्याला रास्त भाव देण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती कोणत्याच पक्षामध्ये नाही असे दिसून आले.' अशी खंत प्रामाणिकपणे व्यक्त केली होती.
स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांनंतरही या परिस्थितीत काहीही बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. आजचीच परिस्थिती लक्षात घ्या. पन्नास पन्नास वर्षे सत्तेच्या खुर्चीत बसलेले नेते (खरे तर लबाड लांडगेच ते!) शेतकर्यांच्या प्रश्नासाठी दुष्काळी दौरे काढताहेत. शाळकरी शेंबड्या पोराला जो दुष्काळ समजतो तो समजून घेण्यासाठी यांना आलिशान दौरे काढावे लागतात. या लोकांना शरद जोशी समजणार नाहीत, किंबहुना त्यांना त्याची गरज वाटत नाही. परिस्थिती अतिशय अवघड आहे. शरद जोशी यांच्यासाठी यापूर्वी लिहिलेल्या एक कवितेत मी म्हटले होते,
'रात्रंदिवस काबाडकष्ट करणारे उद्यमी हात
महारोग्याच्या सडलेल्या हाताहूनही गलितगात्र ठरतात
आणि, झाडाला लटकतात त्या वेळी
मानवजातीच्या र्हासाचे ठरतात ते निदर्शक'
शेतकर्याची आत्महत्या ही समाजाला लांछनास्पद घटना आहे, अनन्यसाधारण बाब आहे असे आम्हाला वाटत नाही; शेतकर्याची आत्महत्या हा केवळ वर्तमानपत्रांतील बातम्यांचा, वाहिन्यांवरील चर्चांचा विषय ठरतो आहे.
माझ्या बळीराज्याच्या पाईक भावाबहिणींनो, आपल्या सर्वांच्या आठवणीसाठी मी हे लिहितो आहे. शेतकरी संघटनेची अनेक अधिवेशने आणि मेळावे झाले. त्या प्रसंगी त्या त्या वेळच्या देशातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीनुसार शरद जोशींचे होणारे बीजभाषण आणि अखेरचे समारोपाचे भाषण म्हणजे त्या वेळच्या परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी दिलेली ऊर्जा होती. ही ऊर्जा देणारा सूर्य आता मावळतीकडे झुकला आहे. या ठिकाणी मला ज्ञानसूर्य ज्ञानेश्वराच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो. समाजाने बहिष्कृत केल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने विरक्त वृत्तीचे ज्ञानेश्वरही खचून जातात, झोपडीची ताटी बंद करून स्वतःला कोंडून घेतात. लहानशी बहीण मुक्ताई ज्ञानी भावाला या परिस्थितीतून बाहेर आणते. आणि ज्ञानदेव या विमनस्कतेतून बाहेर येतात. आणि पुढचा भव्यदिव्य प्रवास घडतो. मानवजातीला पसायदानाचा प्रसाद मिळतो. शरद जोशी यांनी आपल्याला सुरुवातीलाच सांगितले आहे, "कलियुगामध्ये पुरुषावतार जन्म घेत नाहीत; संघटना हीच शक्ती असते. तुम्ही संघटित झालात म्हणजे तिथेच परमेश्वराचे अधिष्ठान निर्माण होते हे लक्षात ठेवा. कुण्या एका व्यक्तीमुळे इतिहास घडत नाही किंवा बदलत नाही. इतकी वर्षे अंधारात राहिलेल्यांना आता मान वर करायला मिळणे हा इतिहासाचा क्रम आहे. इतिहासच काळाची पावले ठरवत असतो." ही परिस्थिती निर्माण करण्याचे काम आता तुम्हाआम्हालाच करावे लागणार आहे. यापूर्वी आपल्याशी संवाद करताना मी लिहिलेल्या एका वाक्याचा पुन्हा उल्लेख करतो, 'जग पराजयाला क्षमा करेल, परंतु संधीचा योग्य फायदा न घेणार्याला मात्र कधीच क्षमा करणार नाही.' हे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी समर्थ नेतृत्व लाभलेल्या आपल्यासारख्या संघटना पाईकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करवी लागणार आहे. अन्यथा इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही.
दोन गोष्टी करणे निश्चित आपल्या हाती आहे. एक, भारतीय शेतकर्याच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या संघटना पाईकांना कृतिशील श्रद्धांजली समर्पित करून त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करणे आणि दुसरे, सर्वांनी एकसंध होऊन मावळतीकडे प्रवास करणार्या ज्ञानसूर्याला वंदन करून कृतज्ञता व्यक्त करणे. कारण, कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा विशेष आहे. बळीराज्याचे आम्ही पाईक इतके तर नक्कीच करू शकू. हा 'कृतज्ञता सोहळा'निश्चितपणाने आपल्या जीवनाला कृतार्थता देणारा ठरेल.
- श्याम पवार, महाळुंगे (इंगळे), जि. पुणे
मोबाइलः ९८६०८९२९६७