नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीबदलता भारत आणि शरद जोशी

बदलता भारत आणि शरद जोशी

            माझ्या या व्याख्यानाचे मी दोन भाग करणार आहे. पहिला भाग 'बदलता भारत' आणि दुसरा भाग 'त्या बदलत्या भारताचा श्री. शरद जोशी यांच्याशी असलेला संबंध' असा असेल. पहिल्या भागात मी दोन मुद्दे मांडणार आहे आणि दुसर्‍या भागामध्ये चार मुद्दे मांडणार आहे.

           'बदलता भारत' हा तसा माझ्या आणि आपल्यापैकी अनेकांच्या चिंतनाचा, अभ्यासाचा विषय असावा कारण आपला देश बदलतो आहे या विषयी काही शंका नाही. गावोगावी, खेडोपाडी, जेथे जेथे आपण जातो तेथे तेथे हे बदल आपल्याला दृग्गोचर होतात. आज छोट्या छोट्या गावांमधल्या एस्. टी. स्थानकावरील दुकानातसुद्धा एखादी किशोरी येते आणि दुकानदाराकडे शांपुची मागणी करते; अशा गावात की ज्या गावात आंघोळीला तर सोडाच पण प्यायलासुद्धा पोटभर पाणी मिळत नाही. हा त्या बदलाचा एक भाग आहे. जागोजागी असणारी मल्टिप्लेक्स्, जागोजागी उघडले जाणारे मॉल्स्, मोटारगाड्यांचा सगळीकडे झालेला सुळसुळाट हादेखील या बदलांचा एक भाग आहे. या चाकणसारख्या ठिकाणीसुद्धा मर्सिडीज मोटारी तयार करण्याचा कारखाना आहे, टाटा मोटर्सचे कारखाने आहेत; 'ऑटॉमोबाईल हब' म्हणून हा भाग विकसित झाला आहे. ही सगळी बदलत्या काळाची क्षणचित्रे आपल्यापुढे आहेत. 

            मला स्वतःला 'बदलता भारत' ही संकल्पना मांडताना दोन वस्तुंचा प्रतीकात्मक आधार घ्यावासा वाटतो. त्यातले पहिले प्रतीक म्हणजे माझ्यासमोर असलेली ही 'बिस्लेरी'ची बाटली आहे.

       आज तुम्ही भारतामध्ये कोठेही जा, कुठल्याही शहरामधली कुठलीही व्याख्यानमाला असो, व्याख्यात्याच्या समोरच्या टेबलावर ही बिस्लेरीची बाटली विराजमान झालेली आपल्याला दिसेल. ही बिस्लेरीची बाटली बदलत्या भारताची एक प्रतीक आहे. मला ही बिस्लेरीची बाटली भारताच्या पराजयाचे, अधोगतीचे, असफलतेचे प्रतीक वाटते. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झाल्यानंतरसुद्धा आम्ही आमच्या देशामधील लोकांना प्यायला शुद्ध पाणी नळांतून पुरवू शकलेलो नाही. आपल्या देशात नळातून येणारे पाणी हे अशुद्धच असते, ते पिण्याजोगे नसते हे सर्वमान्य झालेले आहे आणि त्यावर उतारा म्हणून ही बिस्लेरीची बाटली आज सगळीकडे प्रचलित झालेली आहे. हे आपले फार मोठे अपयश आहे असे मला वाटते, कारण 'प्यायचं पाणी' ही जी जनतेची सर्वांत मूलभूत अशी गरज आहे तीसुद्धा आम्ही अद्याप भागवू शकलेलो नाही. जगातल्या कोठल्याही देशामध्ये आपण गेलो आणि स्थानिक लोकांना विचारले की, 'या नळातून येणारे पाणी मी प्यायलो तर चालेल का?' तर ती मंडळी आपल्याला हसतात आणि म्हणतात, 'हा काय प्रश्न झाला काय? नळातलं पाणी हे पिण्याजोगंच असतं.' जगातल्या प्रगत देशांमध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही; तेथे आपण नळाचे पाणी पिऊ शकतो. आपल्या देशात ते घडत नाही. आज मुंबईसारख्या ठिकाणी निम्मी मुंबई अगदी प्रातर्विधीकरितासुद्धा रस्त्यांचा आश्रय घेते आणि तेथेदेखील आपण आवश्यक तो पाणीपुरवठा करू शकत नाही. आपल्या देशातल्या सगळ्या नद्या, आपण कितीही 'सुजलाम् सुफलाम् सस्यश्यामलाम्' म्हटले तरी, इतक्या प्रदूषित झालेल्या आहेत की त्या कोठल्याही नदीचे पाणी आज पिण्याजोगे राहिलेले नाही. ही बिस्लेरीची बाटली आपल्या पराजयाची आणि आज आपण नेमके कोठे आहोत हे सांगणारे एक प्रतीक आहे असे मला वाटते.

            दुसर्‍या एका कारणास्तव मला ही बिस्लेरीची बाटली बदलत्या भारताची प्रतीक वाटते. आपण भारतीय विचार करतो, 'ठीक आहे, प्यायला शुद्ध पाणी नळातून मिळत नाही ना, हरकत नाही; मला पंधरावीस रुपये देऊन ही पाण्याची बाटली खरेदी करणं परवडतं, मी ती खरेदी करून माझी गरज भागवतो, मी स्वतःला सुरक्षित ठेवतो आणि मी माझ्यापुरता हा प्रश्न मिटवतो.' अशी आपल्या सर्वांचीच धारणा असते. हा जो विशिष्ट दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोनदेखील मला बदलत्या भारताचे प्रतिकात्मक रूप वाटते. कोणतीही समस्या आपल्याला पूर्णांशाने किंवा मूलभूतरित्या सोडवता येत नसताना आपण किमान स्वतःपुरतीतरी ती समस्या मिटवून टाकतो, आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण आपण त्यातल्या त्यात सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि बा़की जगाचे काय व्हायचे ते होऊ द्या, बाकी लोकांना पाण्याची बाटली मिळो न मिळो, माझी गरजतरी मी भागवली अशा कृतक समाधानामध्ये आपण मश्गुल होऊन जातो. बिस्लेरीची बाटली हे बदलत्या भारतातील या आपल्या एक प्रकारच्या पलायनवादी दृष्टिकोनाचेदेखील मला प्रतीक वाटते. आपण असा विचार क्षणभरही करीत नाही की पंधरावीस रुपये देऊन एखादी बाटली खरेदी करणे आपल्याला परवडेल, परंतु या देशातील सव्वाशे कोटी लोकांना ते परवडेल का? त्यांची पाण्याची गरज कशी भागेल हा प्रश्न अजूनही आपल्यापासून मैलो दूर आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अनेकजणांनी अनेक वेळा पुढाकार घेतला. सर विश्वेश्वरय्या अय्यर यांच्या गंगा-कावेरी जोडाव्यात या Garland of Rivers प्रस्तावापासून सुरेश प्रभू अशा अनेकांनी अनेक प्रस्ताव मांडले, ते प्रस्ताव वारंवार चर्चेला आले, त्यांच्यावर चर्चाही खूप झाल्या पण प्रत्यक्षात कोणीही हा प्रश्न अद्याप सोडवू शकलेले नाहीत. तसे प्रयत्नही कुठे दिसत नाहीत. या आपल्या आजच्या वास्तवाचे ही बिस्लेरीची बाटली प्रतीक आहे.

       आपण सुपर पॉवर - महासत्ता - बनायची स्वप्ने पहाणे हीदेखील किती मोठी आत्मवंचना आहे याचेदेखील ही बिस्लेरीची बाटली हे प्रतीक आहे असे मला वाटते.

            बदलत्या भारताच्या संदर्भात बोलताना मला आणखी एक उदाहरण समोर ठेवावेसे वाटते जे बदलत्या भारताचे आणखी एक प्रतीक आहे. ते मी आवर्जून पुढे ठेवू इच्छितो कारण जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरण यांच्या योगाने जे काही परिवर्तन भारतात येऊ घातले आहे त्या सगळ्यात भारताची मूलतः प्रगती होत आहे असे मानणार्‍यांपैकी मी एक आहे. सध्या र्‍हासपर्व चालू आहे, प्रत्येक बाबतीत आपण खाली खाली जात आहोत अशी माझी भावना अजिबात नाही. उलट, शंभर वर्षांपूर्वी आपण ज्या पातळीवर होतो त्यापेक्षा आज आपण नि:संशय सुखी आहोत असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून, बदलत्या भारतातील बिस्लेरीच्या बाटलीसारखी काही उदाहरणे आपल्या अपयशाची प्रतीके असली तरी काही क्षेत्रांतील आपल्या यशाचे, आपण काय करू शकतो, काही क्षेत्रांतील अपयशावर मात कशी करू शकतो याचे प्रतीक म्हणून 'मोबाइल फोन'चा - जो जवळजवळ प्रत्येकाकडे असतो, एखाद्याकडे नसला तरी त्याच्या घरातील कोणाकडेतरी नक्कीच असतो - मी उल्लेख करू इच्छितो. हा मोबाइल गेल्या दहा वर्षांमध्ये भारतामधल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये, छोट्या छोट्या खेड्यामध्ये इतकेच काय वाड्यावस्त्यांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि, ही करामत तंत्रज्ञानाची करामत आहे; ही करामत विशिष्ट आर्थिक घटकांची करामत आहे. त्याच्याबद्दल मी आपणाशी बोलू इच्छितो, कारण हा 'मोबाइल' हेदेखील बदलत्या भारताचे एक आशादायी प्रतीक आहे असे मला वाटते.

            दहा वर्षांपूर्वी मोबाइल फोन हे भारतात सहसा कोठे उपलब्ध नव्हते, क्वचित तुरळक असतील. पण, त्यानंतर ज्या प्रचंड वेगाने मोबाइलचा प्रादुर्भाव देशभर झाला हेदेखील मला विलक्षण आशादायी असे चित्र वाटते. आता जरा विचार करा. एक वेळ अशी होती की हा मोबाइल म्हणजे श्रीमंतांची चैन म्हणून त्याच्याकडे बघीतले जायचे. परंतु, आज जर आपण पाहिले तर हा मोबाइल ही प्रत्येकाची गरज बनली आहे. हे कसे झाले आणि का झाले? याचा उपयोग काय?

            पुण्यामध्ये साफसफाईचे काम करणार्‍या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी महिला असतात. त्यांचे गट असतात आणि प्रत्येक गटावर एक मुकादम असतो/ते. त्यांना मुकादमाकडून सांगितले जाते की आज तुमची ड्युटी कोठे आहे - विद्यापीठासमोर आहे, चतु:शृंगीसमोर आहे की आणखी कोठे आहे. पूर्वी अशी पद्धत होती की त्या त्या दिवशी सकाळी तो मुकादम त्यांच्याकडे जायचा किंवा त्या सफाई कर्मचारी त्याच्याकडे जायच्या आणि त्यांना सांगितले जायचे त्यांची ड्युटी कोठे आहे ते. आज परिस्थिती अशी आहे की मोबाइलवरून त्यांना एस्एम्एस् येतो आणि त्यावरून त्यांना कळते त्यांची ड्युटी कोठे आहे ते. त्यांना त्या मुकादमाकडे जाण्याचे श्रम घ्यावे लागत नाहीत किंवा त्या मुकादमालाही त्यांच्याकडे कोठे निरोप पाठवावा लागत नाही. अश्या तर्‍हेने मोबाइलमुळे श्रमशक्तीची किती मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाली आहे याचा आपण अंदाज काढू शकतो. 

         आज समुद्रकिनार्‍यावरचा कोळी मोबाइल फोन करून विचारू शकतो की मी पकडलेल्या मासळीचा भाव अमुक अमुक बाजारात किती आहे आणि तमुक बाजारात किती आहे आणि त्यावरून तो ठरवू शकतो की आपण पकडलेली मासळी कोणत्या बाजारात पाठवायची.

            मोबाइलचे अगणित उपयोग आहेत. मोबाइलवर गाणी ऐकता येतात, एफएम रेडिओ ऐकता येतो, टीव्हीवरचे चित्रपटही पहाता येतात. या व्याख्यानाला आज सकाळी निघताना मला असे वाटले की फिरंगोजी नरसाळाची मला थोडी अधिक माहिती असायला हवी. माझ्या मुलीला मी म्हटले, 'फिरंगोजी नरसाळा हे चाकणचे किल्लेदार होते असे मी इतिहासात वाचले आहे, पण तुला काही त्यांच्याविषयी अधिक माहिती आहे का?' ती म्हणाली, 'एक मिनीट थांबा.' तिने तिच्या मोबाइलवरून इंटरनेट कनेक्ट केले आणि एका मिनिटाच्या आत मला सांगितले की, 'फिरंगोजी नरसाळाने शाहिस्तेखानाविरुद्ध दोन महिने लढा दिला. शाहिस्तेखानाने त्याला ऑफर दिली होती की तू माझ्या बाजूने ये, मी तुला सरदार करतो; पण त्याने नकार दिला.' अशी बरीच माहिती माझ्या मुलीने चहा पिता पिता मोबाइलच्या सहाय्याने एका मिनिटाच्या आत मला दिली. या मोबाइलचे असे अक्षरशः अगणित उपयोग आहेत. 

            मला पुढच्या आठवड्यात सोलापूरला जायचे आहे. पूर्वी जर मला सोलापूरला जायचे असले तर मला तिकिट बुक करायला स्टेशनवर जायला लागायचे, तास दोन तास लाईनीत उभे रहायला लागायचे किंवा माझ्यासाठी दुसरे कोणीतरी हे सगळे करायचे आणि मग ती दुसरी व्यक्ती ते तिकिट माझ्यापर्यंत आणून पोहोचवायची. काल मी माझ्या मोबाइलवरूनच सोलापूरच्या तिकिटासाठी बुकिंग केले आणि रात्री माझ्या मोबाइलवर एस्एम्एस् आला की तुमचे अमुक अमुक तिकिट बुक झालेले आहे, तुमचा सीट नंबर अमुक अमुक आहे. 

            तुम्ही दुकानामध्ये जाता आणि क्रेडिट कार्डावर काही खरेदी करता. ज्या क्षणी दुकानदार तुमचे कार्ड त्याच्या मशीनमध्ये स्वाईप करतो त्याच क्षणी तुमच्या मोबाइलवर तुमच्या बँकेचा एस्एम्एस् येतो की तुमच्या क्रेडिट कार्डावर अमुक अमुक दुकानातून अमुक अमुक वेळेला अमुक अमुक रकमेची खरेदी झालेली आहे. तुमच्या बँकखात्यात कोणी रक्कम भरली तर त्याचीही माहिती एस्एम्एस् ने अशाच प्रकारे तुमच्या मोबाइलवर येते.

            मोबाइलचे असे अनंत उपयोग आहेत व त्यांची यादी करायची ठरवले तर कितीही वेळ दिला तरी पुरायचा नाही. आता असा विचार करा, भारतात या मोबाइलचा हा जो प्रचंड प्रादुर्भाव झालेला आहे तो कोणत्या शासकीय अनुदानातून झाला आहे का? नाही. यासाठी भारत शासनाने काही विशेष प्रयत्न केले आहेत का? नाही. आता प्रत्यक्ष मोबाइलचा विचार करा. हा मोबाइल एवढासा असला तरी त्याच्याकरिता प्रचंड यंत्रणा लागते. या मोबाइलमधले वेगवेगळे भाग हे जगातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेले असतात; एखादा भाग कोरियामध्ये बनला असेल, एखादा चीनमध्ये बनला असेल. या मोबाइलकरिता उंच उंच टॉवर्स् लागतात. भारतामध्ये असे जवळ जवळ तीन लाख टॉवर्स् आहेत. प्रत्येक टॉवरमुळे टॉवरच्या उभारणीपासून ते त्याच्या मेन्टेनन्स् पर्यंत निदान पंधरावीस लोकांना रोजगार मिळतो. एकट्या औंधमध्ये मोबाइलस् विकणारी कमीत कमी वीस दुकाने आहेत. तेथून तुम्ही मोबाइल विकत घेऊ शकता. औंधमध्येच आणखी किमान पन्नास अशी दुकाने आहेत जेथे तुम्ही तुमचा मोबाइल दुरुस्त करून घेऊ शकता किंवा तुमचा मोबाइल रीचार्ज करून घेऊ शकता. या दुकानांमुळेही अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. म्हणजे 'मोबाइल' ही या देशात बर्‍यापैकी रोजगारनिर्मिती करणारी यंत्रणा ठरली आहे. ही यंत्रणा कशी उभी राहिली? ही यंत्रणा सायलेन्ट मोडने, शांतपणे, मांजरीच्या पावलाने उभी राहिली आहे. हे नेटवर्क जे सबंध देशभर पसरू शकले ती विज्ञानाची करामत आहे तशीच आधुनिक अर्थव्यवस्थेचीही करामत आहे. त्याच्यामधे काही शासकीय सहभाग नाही किंवा कोणी विद्वद्जनांनी खूप वैचारिक परिवर्तन केले म्हणून झालेले परिवर्तन असेही या परिवर्तनाचे स्वरूप नाही. खरी क्रांती ही वाजतगाजत, झेंडे मिरवीत, घोषणा करीत येत नाही; खरी क्रांती अशीच उत्क्रांतीच्या स्वरूपात येते, मांजरीच्या पावलांनी येते आणि अश्या क्रांतीचे हे 'मोबाइल' मला एक प्रतीक वाटते.

अश्या प्रकारची क्रांती आज भारतामध्ये अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रांत येत आहे.

            सध्या आयटी (IT) क्षेत्राचा जीवनाच्या सगळ्याच अंगांवर प्रभाव आहे. पूर्वी मॅट्रिकनंतर काय असा प्रश्न विचारला की हमखास उत्तर 'इंजिनीअर किंवा डॉक्टर' असे मिळत असे; आज प्राधान्याने ‘आयटी’ असे मिळते. बेंगरुळूला 'इन्फोसिस' नावाची कंपनी आहे. नवा भारत, बदलता भारत हा कसा घडतो आहे याचे एक प्रतीक आपण तेथे गेलो तर पहायला मिळेल. नजर पोहोचेपर्यंत ती कंपनी पसरलेली आहे. पन्नससाठ हजार तरूण कर्मचारी जेथे काम करतात अश्या प्रचंड वास्तू त्या परिसरात साकार झालेल्या आहेत. त्या परिसरात आपल्याला दोन दिवस काढण्याची संधी मिळाली तर हा ‘बदलता भारत’ कसा आहे याची आपल्याला एक झलक पहायला मिळेल.

            या ‘बदलत्या भारता’त एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे; सर, साहेब असे म्हणायची पद्धत नाही. सामान्यतः ज्या आडनावावरून एखाद्याची जात कळते त्या आडनावाचा उल्लेखच इथे खास करून होत नाही. या एकाच सामान्य गोष्टीमुळे, संबोधनाच्या पद्धतीमुळे जातिभेदावर एक उत्तम इलाज साकार होत आहे. आयटीमध्ये जातिभेद, धर्मभेद जवळ जवळ नाहीत. गेल्याच महिन्यामध्ये आयटीमध्येच काम करणार्‍या एका मुलीच्या लग्नाला आम्ही बेंगरुळूला गेलो होतो. तिचा नवरादेखील आयटीमध्येच, पण दुसर्‍या शहरात काम करणारा. त्या लग्नामध्ये पुढाकार घेणारी जी मंडळी होती ती मुलाच्या किंवा मुलीच्या घरची नव्हती तर तिचे तीन मित्र होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिचे ते तिघेही मित्र मुसलमान होते आणि तरीही हिंदु पद्धतीने केल्या जाणार्‍या त्या विवाहसोहळ्यात त्यांचा विशेषत्वाने सहभाग होता. हे परिवर्तन, जे अनेक दशकांच्या प्रबोधनातूनही साकार झाले नसते ते आज आयटीमुळे अगदी सहजगत्या साकार होताना आपल्याला दिसते आहे. हा काही अपवादात्मक प्रकार नाही, यांची संख्यादेखील बर्‍यापैकी आहे. 

            इन्फोसिसच्या त्या परिसरात पंचावन्न हजर तरूणतरुणी काम करतात. ही सगळी मंडळी काही एलाईट कुटुंबांतली आहेत का, उच्चभ्रू कुटुंबांतली आहेत का? तर तसेही नाही. इन्फोसिसची रिक्रूटमेंट - कर्मचारी भरती - ही आयआयटीमध्ये होत नाही, इन्फोसिसची भरती ही आयआयएममध्येही होत नाही. इन्फोसिस ही कंपनी दुय्यम-तिय्यम शहरांमधल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाते आणि तेथील विद्यर्थ्यांचा कँपस इन्टरव्हू घेऊन आपल्या कर्मचार्‍यांची भरती करते. निवड झालेल्यांतील अनेक मुले ज्याला 'फर्स्ट जनरेशन ग्रॅजुएट' म्हणता येईल - म्हणजे पदवीधर होणारी कुटुंबातील पहिली व्यक्ती - अशा सर्वसामान्य कुटुंबातील असते. तरीही, आयटीमुळे साकार होत असलेल्या जातिभेद, धर्मभेद बाजूला सारण्याच्या या क्रांतीतील ती व्यक्ती शिलेदार असते. ही फार मोठी क्रांती आपल्या देशामध्ये घडत आहे आणि आपण याचीदेखील दखल बदलत्या भारताचा विचार करताना घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हेदेखील खरे आहे की हे जे परिवर्तन घडते आहे, ही जी स्वप्नपूर्ती होते आहे, भारताच्या काही टक्क्यांपुरतीतरी साकार होत आहे, त्या टक्केवारीचे प्रमाणमात्र अद्यापतरी अत्यल्प आहे.

            चाकण कॉलेजमधून मी ज्या मोटारीने इथे आलो ती उत्तम एअरकंडीशंड मोटार होती, पण ज्या रस्त्याने ती आली त्या रस्त्यावर इतके खड्डे आहेत की ती सतत खालीवर हलत होती. उत्तम मोटारी आपण घेऊ शकतो, पण आपण उत्तम रस्ते नाही करू शकत. 

          त्या रस्त्याने येताना दोन्ही बाजूंना झोपड्या होत्या. त्यांना ‘बीड वस्ती’ म्हणतात म्हणे. कारण, बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी आलेले कामगार झोपड्या बांधून इथेच राहिले, मिळतील ती बारीकसारीक कामे करू लागले. पण त्यांच्या झोपडपट्टीत पहाताना त्यांच्या घरांत समृद्धी पाझरली आहे, सुबत्ता आलेली आहे असे काही मला आढळले नाही. एकीकडे भारत बदलताना दिसतो आहे तर दुसरीकडे रस्ते नाहीत, चाकणच्या बीड वस्तीत समृद्धीचा स्पर्शही दिसत नाही अशी या बदलत्या भारताची शोकांतिकाही दिसते आहे. पण तिच्यावर आपण मात करू शकतो आणि ती मात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकत्वाने करता येईल, उत्तम आर्थिक धोरणांनी करता येईल.

           'बदलता भारत' हा विषय तसा मोठा आहे, त्याच्या प्रतीकांची यादी न संपणारी आहे, पण त्यांतील काही प्रतीके म्हणून मी बिस्लेरीची बाटली, मोबाइल आणि इन्फोसिस यांचा उदाहराणादाखल उल्लेख केला. हा झाला माझ्या भाषणाचा पहिला भाग.

         आता माझ्या भाषणाच्या दुसर्‍या भागाकडे मी वळतो. या ‘बदलत्या भारता’चा संबंध शरद जोशींशी कसा जोडता येऊ शकतो या विषयी मी या भागात चार मुद्दे मांडू इच्छितो. 

माझा आणि शरद जोशींचा परिचय हा तुलनेने अगदी अलीकडचा, म्हणजे गेल्या आठदहा वर्षांतलाच आहे. त्यामुळे, एक व्यक्ती म्हणून श्री. शरद जोशी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार खरे तर मला नाही, परंतु त्यांची जी वैचारिक मांडणी आहे, त्यांचा जो विचार आहे, त्यामधील 'बदलत्या भारता'ला पूरक असे आणि महत्त्वाचे चार मुद्दे मी आपणापुढे मांडतो. 

त्यातला पहिला 'अर्थवाद किंवा समृद्धी' हा आहे.

        शरद जोशींच्या कोणत्याही मांडणीत मला दारिद्र्याचे उदात्तीकरण केल्याचे आढळत नाही. दरिद्री माणसाला दरिद्रीनारायण म्हणणे आणि त्या दारिद्र्याला पूज्य स्थान देणे ही एक प्रकारची आत्मवंचना आहे आणि अशा प्रकारची आत्मवंचना मला शरद जोशींच्या मांडणीत कोठेही दिसत नाही. आणि हा दृष्टिकोन समृद्धीला पूरक आहे. आपण समृद्धी निर्माण करायला हवी हा दृष्टिकोन शरद जोशींच्या मांडणीमध्ये सातत्याने मला दिसत आलेला आहे. त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एखाद्याच्या शरीरातले रक्त दूषित झाले आहे आणि त्या दूषित रक्ताचा परिणाम म्हणून सबंध शरीरावर फोड वगैरे येणे हा प्रकार होत आहे तेव्हा आपण फक्त त्या फोडांवर लक्ष दिले, त्यांच्यावरच इलाज करीत राहिलो तर ते पुरेसे नाही; मूळ जे दूषित रक्त आहे ते बदलणे आवश्यक आहे, रक्त दूषित करणारी कारणे दूर करणे आवश्यक आहे. तसे देशाच्या शरीरातील दूषित रक्त हे ज्या दारिद्र्य, गरिबी यांच्यामुळे निर्माण झालेले आहे ते दूर करा, बाकी सगळे आजार आपोआप दूर होतील. ही मांडणी प्रभावीपणे आणि वैचारिकदृष्ट्या इतक्या नि:संदिग्धपणे शरद जोशींनी केल्याचे माझ्या लक्षात आले आणि बदलत्या भारताच्या संदर्भात ही मांडणी मला नितांत आवश्यक वाटते. त्यांनी अर्थवादाला प्राधान्य दिले. तसे अनेक वाद आहेत - जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, भाषावाद, प्रांतवाद वगैरे वगैरे. या सगळ्या प्रकारच्या वादांचा उल्लेख श्री. जोशी यांनी 'क्षुद्रवाद' अशा शब्दांनी केलेला आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये हा शब्द मला जागोजाग वाचायाला मिळतो. आणि खरोखरच, मूळ प्रश्न आपण दुर्लक्षित ठेवतो तेव्हा हे सगळे क्षुद्रवाद उफाळून येतात. १९८४ मध्ये चंडीगढला एक लाख शेतकर्‍यांनी राजभवनाला वेढा टाकला, त्याच्या विषयी माझ्या शेजारीच रहाणारे त्यांचे कार्यकर्ते बद्रीनाथ देवकर म्हणून जे आहेत, जे तेथे होते त्यांच्याकडून जे ऐकायला मिळाले ते असे होते की, त्या वेळेला खलिस्थानचा प्रश्न खूप चर्चेत होता. पण, शरद जोशींची मांडणी अशी होती की खलिस्थानचा प्रश्न हा धर्माशी निगडित अजिबात नाही, तो शेतीच्या अपयशाचा प्रश्न आहे आणि ती मांडणी तेथे हजर असलेल्या स्वामीनाथन अय्यर या पत्रकाराला इतकी भावली की त्यांनी दुसर्‍या दिवशीच्या इकॉनॉमिक टाईम्समध्ये असे लिहिले होते की पंजाब शरद जोशींच्या हाती सोपवावा, सहा महिन्यांत खलिस्थानचा सगळा प्रश्न मिटेल. कारण, मुळात तो खलिस्थानसारखा धर्माधिष्ठित प्रश्न नाहीच. ही मांडणी भारतामध्ये दुसर्‍या कोणत्या व्यक्तीने केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नव्हते.

          मुसलमानांच्या हिंदुस्थानावर ज्या स्वार्‍या झाल्या, जी देवळे फोडली गेली त्यामागे तिथली संपत्ती घेणे हा उद्देश होता; त्याच्या मागे धार्मिक भूमिका नव्हती; अर्थवाद प्रमुख होता, धर्मवाद दुय्यम होता ही मांडणीसुद्धा मला शरद जोशींच्या लिखाणामधून प्रथम जाणवली. अल्लाउद्दिन खिलजी रामदेवराय यादवाच्या देवगिरीपर्यंत हजार मैलांचे अंतर पादाक्रांत करून येऊ शकला, कारण वाटेत त्याला रामदेवरायाच्या प्रजेकडून व इतर हिंदू राजांकडून विरोध झाला नाही; आणि विरोध झाला नाही कारण तिथला जो सर्वसामान्य शेतकरी होता तो इतका प्रचंड शोषित होता की आपण लुटले कोणाकडून जायचे, या राजाकडून का त्या राजाकडून एवढाच पर्याय त्याच्या समोर होता. ही मांडणी शरद जोशींच्या लिखाणात आपल्याला प्रथम जाणवते. आणि, ही सगळी मांडणी बदलत्या भारतासाठी, नव्या भारतासाठी मला आवश्यक वाटते. सर्व प्रकारचे प्रांतभेद, धर्मभेद, जातिभेद हे मूलतः क्षुद्रभेद आहेत, हे भेद अर्थवादाशी निगडित आहेत आणि अर्थवादाची आपण काळजी घेतली, त्या योगे समृद्धी आली तर हे भेद रहाणार नाहीत. आज देशामध्ये जेवढी काही आंदोलने होत आहेत त्यांतील नव्वद टक्के आंदोलने ही कोठल्यातरी अस्मितेच्या प्रश्नावरून होताना आपल्याला दिसते - भाषिक अस्मिता असेल, प्रांतीय अस्मिता असेल, कोणाला तेलंगणा हवा आहे, कोणाला आंध्र हवा आहे. पण हे प्रश्न तुलनेने दुय्यम आहेत, खरे प्रश्न जे आहेत ते वेगळेच आहेत ही जाणीव शरद जोशी आपल्याला देतात; जी जाणीव मला बदलत्या भारतासाठी आवश्यक वाटते.

         शरद जोशींनी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या लेखनात अर्थावादाच्या जोडीला समृद्धीचे जे चित्र रेखाटले तेदेखील मला खूप रोचक आणि आवर्जून सांगावेसे वाटते. त्यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, आम्हाला या जिल्हा परिषदेच्या शाळा काय कामाच्या आहेत जिथल्या भिंतीतून माती ढासळते, छपरातून पावसाळ्यात पाणी गळते, जेथले दिवे चालत नाहीत, जेथे फळा असतो तर खडू नसतो आणि खडू असतो तर फळा नसतो! किंवा आम्हाला ही प्राथमिक आरोग्य केंद्रे काय कामाची तेथे डॉक्टर आहेत तर नर्स नाही, एकाच रंगाचे पाणी वेगवेगळ्या बाटल्यांत भरून औषध म्हणून दिले जाते! आम्हाला आमच्या घामाचे दाम मिळू द्या, आमच्या शेतीमालाला रास्त भाव मिळू द्या मग आम्ही उत्तमांतल्या उत्तम शाळांमधून आमच्या मुलांना त्याची फी भरून शिकवू; उत्तमातल्या उत्तम डॉक्टरांना बोलावू. किंबहुना आमच्यात पैसे मोजण्याची क्षमता आली म्हणजे उत्तमातले उत्तम शिक्षणतज्ज्ञ, उत्तमातले उत्तम डॉक्टर येथे आपणहून येतील. हीदेखील मांडणी इतकी मूलभूत आणि इतकी वेगळी आहे, जी आपण अजूनही स्वीकारलेली नाही, की ती अंगीकारण्याची गरज आहे असे मला वाटते. अर्थवाद, आर्थिक समृद्धीचे महत्त्व हा शरद जोशींचा विचारविशेष म्हणून मला अधोरेखित करावासा वाटतो. 

        यालाच अनुलक्षून, दुसरा एक विचार जो शरद जोशींनी मांडला - तंत्रज्ञानाचा अवलंब - तोही मला मूलभूत असा वाटतो. समृद्धी आणि तंत्रज्ञान यांचे परस्परातील नाते खूप आहे. वर मी जे मोबाइलचे उदाहरण दिले आहे तोही तंत्रज्ञानाचाच परिपाक आहे. तंत्रज्ञानाचा मुद्दा जो शरद जोशींनी मांडला तोदेखील मला महत्त्वाचा वाटतो कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत करीतच माणसाचा विकास होत आला आहे. आज सर्वसामान्य माणूसदेखील जी सुखे सहजगत्या उपभोगू शकतो ती सुखे दोनशे वर्षांपूर्वी श्रीमंतांतल्या श्रीमंत माणसालासुद्धा उपलब्ध नव्हती. जगात प्रथमपासूनच काही मूठभर लोक श्रीमंत राहिले आहेत, पण ज्याला मास प्रॉस्पॅरिटी (Mass Prosperity) म्हणजे बहुजनसमाजापर्यंत पोहोचलेली समृद्धी म्हणतात, ती मूलतः केवळ आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही अंशीतरी आज साकार झालेली आहे. आज सर्वसामान्य माणूससुद्धा बटण दाबतो आणि त्याची खोली विजेच्या दिव्याच्या प्रकाशाने भरून जाते, तो बटण दाबतो आणि पंखा सुरू होतो. हे सगळे, दोनशे वर्षांपूर्वीचा विचार केला तर चमत्कारच आहेत. पूर्वी अशा एखाद्या मोठ्या हॉलमधील माणसांना वारा घालण्यासाठी शंभर माणसे नेमावी लागली असती, आज तोच हॉल नुसते एअर कंडिशनरचे बटण दाबताच शीतल होऊ शकतो. ही तंत्रज्ञानाची करामत आहे. तंत्रज्ञानाचे हे महत्त्व शरद जोशींनी सातत्याने मांडले आहे. त्यांनी शेतीपुरताच त्याचा विचार केला असेल किंवा त्याची व्याख्या केली असेल, पण जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणार्‍या तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी मांडलेले आहे. अजूनसुद्धा जनुकपरिवर्तित (Genetically Modified) अन्नधान्ये असू द्या की शेतीमधल्या वेगवेगळ्या यांत्रिक गोष्टींचे समर्थन असू द्या, तंत्रज्ञानाचे समर्थन हे त्यांच्या मांडणीचे विशेष राहिले आहे. आणि आज जर भारताला खर्‍या अर्थाने विकास करायचा असेल तर तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण मेणबत्त्या बनवत असू आणि त्या मेणबत्त्या अधिक चांगल्या बनवायचा प्रयत्न केला, अधिक कार्यक्षमतेने बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. त्याचे कारण असे आहे की कितीही चांगल्या मेणबत्त्या बनवल्या तरी त्यांच्याकडून आपण इलेक्ट्रिसिटीपर्यंत पोहोचू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी हा मेणबत्त्यांपासूनचा एक पॅराडाईम शिफ्ट आहे, ती एक हनुमान उडी आहे. आणि अशी हनुमान उडी ही तंत्रज्ञानच मारू शकते. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा अवलंब शरद जोशींनी सतत अधोरेखित केलेला आहे. बदलत्या भारताच्या संदर्भात मला शरद जोशींची ही मांडणी महत्त्वाची वाटते.

          इथवर समृद्धी किंवा अर्थवाद आणि त्यानंतर तंत्रज्ञान या दोन गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर उर्वरित दोन गोष्टी मांडाव्याश्या वाटतात त्या म्हणजे शरद जोशींनी अधोरेखित केलेले स्वातंत्र्य आणि स्वाभिमान. 

          त्याआधी मला थोडेसे वेगळे काही सांगावेसे वाटते. १९६८ साली शरद जोशी स्वित्झर्लंडमध्ये गेले. तेथे युनायटेड पोस्टल युनियनच्या बर्न येथील मुख्यालयामध्ये नोकरी धरली. त्यानंतरची आठ वर्षे ते स्वित्झर्लंडमध्ये राहिले आणि १९७६ मध्ये भारतात परतले. हा जो आठ वर्षांचा कालखंड आहे - १९६८ ते १९७६ - या कालखंडाबद्दल त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या निकटच्या वर्तुळातील माणसांनी कोणी फारसे काही लेखन केल्याचे किंवा सांगितल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. प्रसंगोपात स्वित्झर्लंडला जाण्याचा योग मला अनेकदा आला आणि मागच्या भेटीमध्ये मी मुद्दाम बर्नला, जेथे शरद जोशींनी आठ वर्षे नोकरी केली तेथे जाऊन आलो आणि त्यांच्या बरोबर काम करणार्‍या एक गृहस्थांना भेटलो, एक सबंध दिवसभर त्यांच्याबरोबर चर्चा केली. माझा असा समज आहे, तो कदाचित चुकीचाही असेल, की तेथल्या आठ वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्या मांडणीतले हे चार मुद्दे - समृद्धी किंवा अर्थवाद, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान - बर्‍याच अंशाने त्यांच्या मनामध्ये स्थिर झाले असावेत. समृद्धीचा प्रश्नच नाही कारण जगामध्ये दर डोई उत्पन्नाच्या बाबतीत स्वित्झर्लंड गेली शंभर वर्षे नंबर एकवर येतो, आज किंवा काल नव्हे. त्याची कारणे अनेक असतील - त्यांची बँकिंग यंत्रणा वगैरे वगैरे. पण त्यांतील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जी शेती आहे ती आजदेखील अतिशय किफायतशीर आहे; विशेषतः तेथील दुग्धशेती - डेअरी फार्मिंग. या छोट्याशा देशामध्ये, ज्याची लोकवस्ती पुण्यापेक्षाही कमी आहे, सव्वीस हजार दुग्ध सहकारी सोसायट्या आहेत आणि या दुग्धशेतीच्या कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये होतो. तो इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये होतो की गायीचे दूध काढण्याकरितासुद्धा माणसाचे हात लागत नाहीत. गाय एका प्लॅटफॉर्मवर उभी रहाते, तो प्लॅटफॉर्म आपोआप पुढे सरकतो, सकर्स यंत्रे असतात ती गायीच्या आचळांभोवती येतात, दूध योग्य त्या प्रमाणात काढले जाते, सकर्स मोकळे होतात, गाय पुढे सरकते, दुसरी गाय त्या जागी येते. त्या दुधावर ज्या काही प्रक्रिया करायच्या त्या प्रक्रिया होतात; त्याचे लोणी बनते, चीज बनते, काय काय बनते आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये मानवी हस्तस्पर्श शून्यवत् असतो. हे जे यांत्रिकीकरण (Mechanization) स्वीस डेअरी इंडस्ट्रीमध्ये झाले आहे ते अभूतपूर्व असे आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व शरद जोशींच्या मनावर ठसायला त्यांचे स्वित्झर्लंडमधील वास्तव्य कारणीभूत झाले असावे.

          त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर आला तेव्हा तो कसा चालवायचा हे शिकण्याकरिता ते बर्नहून जिनेव्हाला गेले आणि तेथे त्यांनी सहा महिन्यांचा कोर्स केला. कारण त्यांना कळले होते या तंत्रज्ञानाचे महत्त्व किती आहे ते. (त्या काळात कॉम्प्युटर अगदी प्राथमिक अवस्थेत होता; त्यात 'यूजर फ्रेंडली' सॉफ्टवेअर्स् नव्हते.) तेथे मोरेश्वर ऊर्फ बाळ संत नावाचे एक भारतीय गृहस्थ होते, तेही युनायटेड नेशनच्या एका विभागामध्ये काम करायचे; त्यांनीही शरद जोशींना टेलिकम्युनिकशनचे महत्त्व सांगितले, संगणकाचे महत्त्व सांगितले. या सगळ्याची शरद जोशींना आवड होती - कदाचित उपजतही असेल, कदाचित जनुकीय असेल, कदाचित विद्यार्जनातून आली असेल - पण होती. आणि त्या सगळ्यातून त्यांनी जो अभ्यास केला त्यामुळे तंत्रज्ञानाचे महत्त्व हे कुठेतरी त्यांचा अंतर्मनात - सबकॉन्शसमध्ये - अधोरेखित झाले असावे. १९७६ साली भारतात परतल्यानंतरदेखील ते एकदा स्वित्झर्लंडला गेले - फक्त एकदाच गेले - आणि टोनी डर होवसेपियाँ (Tony Der Hovsepian) म्हणून त्यांचे जे जुने सहकारी होते त्यांच्या बरोबर ते झुरीचला एका वेफर्स् बनवण्याच्या कारखान्यात गेले. त्यांची अशी इच्छा होती की, 'आपण आपल्या गावात जर बटाट्याचे वेफर्स् केले तर व्हॅल्यू अ‍ॅडिशन होऊ शकते काय? ती किती होऊ शकते? हे पहावे .' ही घटना १९८१ सालची. म्हणजे व्हॅल्यू अ‍ॅडिशन करण्याकरिता तुम्हाला अ‍ॅग्रो प्रोसेसिंग करावे लागेल आणि अ‍ॅग्रो प्रोसेसिंग करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल हे, स्वतः बटाट्याची शेती केल्यानंतर त्यांना एकाच हंगामामध्ये जाणवलेले सत्य होते. हे तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानाचा वापर हा बदलत्या भारताकरिता अपरिहार्य असा आहे. आणि शरद जोशींनी याची मांडणी सातत्याने केलेली आहे हे मला फार मोठे विशेष वाटते. भारतामध्ये बहुसंख्य नेते या बाबतीमध्ये प्रचंड संभ्रमावस्थेतच असतात. त्यांना 'हिंद स्वराज' आठवते, मधेच त्यांना 'गांधीवाद' आठवतो; मधेच ते 'सर्वोदयवाल्यां'सारखे बोलायला लागतात, मधूनच त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टींचा प्रसार शिरतो. शरद जोशींनी मात्र तंत्रज्ञानाला कधीही दुय्यम स्थान दिलेले नाही हा त्यांचा मला एक विशेष वाटतो. 

          अर्थवाद आणि तंत्रज्ञान या दोन्ही मुद्द्यांचे प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन कसे होऊ शकते याचे नेस्ले (Nestle) ही कंपनी प्रतीक आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये नेस्लेचा समावेश होतो. स्वित्झर्लंडमध्ये डेअरी इंडस्ट्री तर प्रचंड होतीच पण नुसते दूध तुम्ही किती विकणार, कोठे विकणार, कसे विकणार? नेस्ले ही कंपनी त्या गरजेतून निर्माण झाली आणि त्यांनी दुधापासून चॉकलेट्स् तयार करायला सुरुवात केली. आज स्विस चॉकलेट्स् जगात सगळीकडे पसरली आहेत. त्यांनी 'बेबीफूड' तयार करायला सुरुवात केली, आज नेस्लेचे बेबीफूड जगात सगळीकडे जाते. त्यांनी क्रीम बनवले, नेस्लेची शंभराच्या वर दुग्धजन्य उत्पादने आहेत आणि ती सार्‍या जगभर खपतात. आणि हा सगळा चमत्कार अर्थवाद आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्तीकरणाने साकार झालेला आहे.

          तसे पहायला गेले तर स्वित्झर्लंडमध्ये खनिज संपत्ती अजिबात नाही, या देशामध्ये माणसांनी वस्ती करावी अशी जागाही फार थोडी आहे, या देशाची एकही वसाहत जगात कोठेही नव्हती, स्वित्झर्लंडने जगातल्या कोणत्याही देशावर कधीही राज्य केलेले नाही - जे पोर्तुगालने केले, स्पेनने केले, फ्रान्सने केले, इंग्लंडने केले; आणि तरीसुद्धा ज्यांच्या जगभर वसाहती होत्या, ज्यांचा त्यांनी आपापल्या पक्क्या मालाच्या बाजारपेठा म्हणून फायदा घेतला, अशा सगळ्या देशांपेक्षा स्वित्झर्लंडची समृद्धी जास्त आहे. हा चमत्कार नसून एक अभ्यासाचा विषय आहे. स्वित्झर्लंडमध्ये वेवे (Vevey) नावाचे एक गाव आहे तेथे सुरुवातीला नेस्ले कंपनीचे मुख्यालय (Head Quarter) होते, पुढे कारभार वाढल्यावर त्यांनी बाजूलाच दुसरे मोठे मुख्यालय बांधले - त्याच गावात. हा मुद्दा लक्षणीय आहे. त्यांचे मुख्यालय झुरीकला नव्हते, जिनेव्हाला नव्हते, बर्नला नव्हते; कोणत्याही मोठ्या शहरात नव्हते, वेवे या खेडेगावात होते. त्यांनी जेव्हा नवीन मुख्यालय बांधले तेव्हा जुन्या मुख्यालयाच्या जागेत त्यांनी World Food Museum स्थापन केले. माणसाचा विकास जसजसा होत गेला तसतश्या त्याच्या जेवणाच्या सवयी कसकश्या बदलत गेल्या याचे दर्शन या म्युझियममध्ये घडते. माणूस जेव्हा गुहेमध्ये रहायचा तेव्हा तो जंगली प्राणी कसा पकडून खायचा, पुढे कधीतरी जंगलामध्ये लागलेल्या आगीत भाजला गेलेला प्राणी त्याने खाल्ला तेव्हा त्याला कळले की हे मांस अधिक रुचकर कसे होते आणि मग तो अन्न शिजवायला लागला, शेतीचा विकास कसा झाला, दूध कसे मिळवू लागला असे करत करत पार अगदी हॅम्बर्गर आणि पिझ्झापर्यंत तो प्रवास आपल्याला या म्युझियममध्ये घडतो. आपण जरा विचार करून बघितले तर आपल्या असे लक्षात येते की या सर्व टप्प्यांमध्ये तंत्रज्ञान हा माणसाचा सर्वांत महत्त्वाचा साथीदार होता. तंत्रज्ञानामुळे अन्न शिजवायची प्रक्रिया सुरू झाली, त्याच्यातून प्रोसेसिंग सुरू झाले आणि अंतीमतः आज आपण ज्या स्वरूपात खाण्याचे पदार्थ आस्वादतो त्या अवस्थेपर्यंत आलो आहोत. हे तंत्रज्ञानाचे योगदान व प्रभाव स्वित्झर्लंडसारख्या देशात मोठ्या प्रकर्षाने आपल्याला जाणवतो म्हणून मुद्दाम मी त्याची मांडणी केली.

          तेव्हा अर्थवाद आणि तंत्रज्ञान यांच्यानंतर शरद जोशींनी मांडलेला 'स्वातंत्र्य' हा तिसरा मुद्दा मला बदलत्या भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो. कारण 'शेतीमालाला वाजवी किंमत मिळावी' या भूमिकेमागेसुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना आहे. कारण, आज शेतकरी अनेक घटकांवर अवलंबून आहे पण त्याऐवजी त्याचे भवितव्य घडविण्याचे स्वातंत्र्य त्याला स्वतःला मिळावे ही भावना त्या मांडणीमध्ये अनुस्यूत आहे. उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणसे वेगवेगळ्या प्रकारे विचार करत जातात, स्वातंत्र्यात त्यांचा आत्मसन्मान जपला जातो. स्वीस लोकांनी स्वातंत्र्याची जपणूक इतर कोणत्याही देशापेक्षा अधिकत्वाने केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक बसेसचा रंग कोणता असावा याच्यावरसुद्धा रेफरेंडम म्हणजे सार्वमत घेतले जाते. कारण, खर्‍या अर्थाने लोकशाहीचे जतन केलेला असा हा देश आहे. या देशाची उभारणीच मुळी दहाबारा टोळ्यांनी एकत्र येऊन, आपापल्या काऊंटीज (Counties) एकत्र आणून आपला एक देश निर्माण करायचा आहे अश्या भूमिकेतून झाली असल्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्य देणे, त्या स्वातंत्र्याच्या कल्पनेभोवतीच त्या देशाचे अस्तित्व गुंफलेले आहे. त्या देशात बर्नला शरद जोशी जेथे रहात होते त्या घराच्या मागेच आल्प्स् पर्वताची शिखरे आहेत. आज शरद जोशी आंबेठाणला अंगारमळ्यातल्या ज्या घरात रहातात त्या घरातून पश्चिमेला दिसणारा भामचंद्राचा डोंगर हा जवळजवळ त्यांच्या बर्नमधील घरामागील डोंगराच्याच रचनेचाच आहे. शरद जोशींना डोंगरांवर चढण्याचा छंद आहे. डोंगरावर चढताना माणूस जसजसा वर वर उठत जातो तसतसा तो स्वातंत्र्याच्या दिशेने अधिक अधिक उत्क्रांत होत जातो. आपली बरीचशी बंधने ही भूमीशी निगडित असतात. As we elevate ourselves we become freer and freer -- आपण जसजसे वर वर जातो तसतशी आपली स्वातंत्र्याची कल्पना अधिक अधिक वर्धिष्णु होत जाते. ही स्वातंत्र्याची कल्पना आजच्या भारतामध्ये मला फार महत्त्वाची वाटते. अशाकरिता की खर्‍या अर्थाने आम्ही अजूनही स्वतंत्र झालेलो नाही. कुठे जातपंचायत असेल, कुठे स्थानिक हितसंबंध असतील, कुठे आईवडिलांची मागणी असेल किंवा समवयस्क दोस्तमंडळींचा पगडा (peer pressure) असेल, पण अनेक घटकांमधून आपल्या देशामध्ये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच सातत्याने होत असतो; आपल्याला हवे तसे आपण वागू शकत नाही. शरद जोशींनी 'स्वातंत्र्याच्या कक्षा (Degrees of Freedom)' ही जी मांडणी केली आहे ती मला त्यांच्या शेतकरी प्रश्नाच्या मांडणीइतकीच, 'इंडिया विरुद्ध भारत' या मांडणीइतकीच, महत्त्वाची वाटते. आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी जो त्याचा पुनरुच्चार केला, राजगोपालाचारींचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केले, तेदेखील मला या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत मोलाचे वाटते. जर आपण स्वातंत्र्याचा विचार केला नाही तर आपण मार्केट फोर्सेस म्हणा की सरकारी फोर्सेस म्हणा, त्यांच्या अधिकाधिक प्रभावाखाली येत रहातो. त्यामुळे, शरद जोशींनी केलेली स्वातंत्र्याची मांडणी मला खूप महत्त्वाची वाटते - जी इतर कोठल्याही विचारवंतापेक्षा, नेत्यापेक्षा त्यांनी अधिक नेमेकेपणाने आणि अधिक नि:संदिग्धपणे केलेली आहे.

          शरद जोशींच्या संदर्भात मला चौथा आणि शेवटचा मुद्दा मांडावासा वाटतो तोही बदलत्या भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे; तो मुद्दा म्हणजे स्वाभिमान - Self-respect; अस्मिता - Dignity. मी काही त्यांच्या कुठल्या आंदोलनात सामील झालो नव्हतो पण मी जे ऐकले आहे, वाचले आहे, पाहिले आहे, अनेकांशी चर्चा केली आहे त्यावरून मला असे जाणवते, की शरद जोशींनी 'स्वाभिमान' या संकल्पनेवर खूप भर दिला आहे. त्यांनी एक घोषणा दिली - 'भीक नको, हवे घामाचे दाम.' आम्हाला कोणाची भीक नको, आम्हाला आमच्या घामाचे दाम हवे; आम्ही जे कष्ट करतो त्याची आम्हाला योग्य ती किंमत द्या, भीक देऊ नका. ही मांडणी मला आजच्या बदलत्या भारताच्या संदर्भात विलक्षण आकर्षक आणि अधोरेखित करावी इतक्या महत्त्वाची वाटते. कारण, आज खरोखरच आपण आपला स्वाभिमान पूर्णतः गमावून बसलो आहोत. आज ज्या प्रकारे 'आम आदमी'वादाच्या नावाने योजनांची खैरात चालली आहे त्यातून आपण माणसाला लाचार करतो आहोत. आपण जेव्हा त्याला दोन रुपये किलोने गहू मिळेल अशी व्यवस्था करतो, तेव्हा त्यालाही कळत असते की गव्हाची जी अतिरिक्त किंमत आहे ती शासन देणार आहे. म्हणजेच, आपण शासनावलंबित होत आहोत ही जाणीव, कळत न कळत त्याच्या मनामध्ये आपण भिनवतो. खर्‍या अर्थाने जर आपण स्वाभिमानी असू तर आपली भूमिका अशी असावी, की मला तुमचे कुठलेही अनुदान नको, मला तुमची कुठलीही भीक नको, मी माझ्या कष्टावर अर्जित अशीच संपत्ती मिळवू इच्छितो. आपल्या देशामध्ये ही भावना एके काळी होती. माझा जन्म मुंबईचा. तेथेच वाढलो. मला आठवते, माझी आई आम्हाला सांगायची, की कोणाकडे जर गेला आणि त्यांनी म्हटले की जेवून जा तर आपण असे म्हणावे की, नको, घरी तयार आहे, माझ्या घरी जाऊन मी जेवेन. कारण, दुसर्‍याच्या घरी कशाला जेवायचे, आपण आपल्या घरी जेऊ याच्यात एक अस्मिता होती. आज आपण असा समाज निर्माण करतो आहोत की ज्याच्यामध्ये अस्मिताच उरलेली नाही आणि जेव्हा स्वाभिमान उरत नाही तेव्हा निजखूण म्हणून, स्वतःची identity म्हणून तुम्हाला इतर क्षुद्रवादाचा आधार घ्यावा लागतो -- तुम्हाला तुमच्या जातीचा आधार घ्यावा लागतो, धर्माचा आधार घ्यावा लागतो, पंथाचा आधार घ्यावा लागतो. कारण मुळातच तुम्हाला जो 'स्वत्व'चा आधार हवा तो तुम्ही गमावून बसलेले असता. 'स्वाभिमाना'ला शरद जोशींनी दिलेले महत्त्व आजच्या काळात मला अधिक महत्त्वाचे वाटते याचे एक दुसरेही कारण आहे. त्या स्वाभिमानाच्या अभावी आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर वेगळी वेगळी आंदोलने उभी रहाताना दिसतात. उदाहरणार्थ, राजस्थानमध्ये मध्यंतरी फार मोठे आंदोलन उभे राहिले, प्रचंड मोठे. काय होते ते आंदोलन? तेथे एक गज्जर समाज आहे. त्या गज्जर समाजाची मागणी अशी होती की आमचा समावेश शासनाने मागास वर्गामध्ये करावा. आता कल्पना करा, माणसाचे स्खलन किती होऊ शकते! जेव्हा एखादा समाज असे म्हणतो की आम्ही मागासलेले आहोत असे तुम्ही म्हणा, तेव्हा त्यामागे भूमिका अशी असते की आपल्याला सवलती मिळाव्यात. पण स्वतःला प्रगत ठरवण्याऐवजी, केवळ सवलती मिळाव्यात म्हणून स्वतःला मागास ठरवण्याचा आग्रह धरणे, त्याच्याकरिता आंदोलन करण्याइतका तो आग्रह तीव्र असणे इतके आमच्या अस्मितेचे स्खलन गेल्या काही वर्षांमधे झालेले दिसते. या पार्श्वभूमीवर, शरद जोशींनी शेतकर्‍यांमध्ये स्वाभिमान वाढावा, स्वतःच्या बळावर त्यांनी उभे रहावे, स्वतःच्या हिमतीवर उभे रहावे याकरिता जी शिकवण दिली ती मला बदलत्या भारताच्या संदर्भात खूप महत्त्वाची वाटते. तुमच्यापैकी अनेकजणांनी कुसुमाग्रजांची 'कणा' या शीर्षकाची कविता ऐकली, वाचली असेल. गोदावरी नदीला पूर आला आहे, त्या माणसाचे घर वाहून गेले आहे आणि तो कवीराजांना भेटायला जातो. कवीराजांना वाटते हा माणूस माझाकडे मदतीच्या अपेक्षेने आला आहे आणि कवीराज त्याला पैसे काढून द्यावेत म्हणून खिशात हात घालतात. तेव्हा तो त्यांचा विद्यार्थी जागचा उठतो आणि जे म्हणतो ते त्या कवितेच्या शेवटच्या ओळींत, ज्या आजही मला हृद्य वाटतात, आहे. त्या शेवटच्या ओळी आहेत :
खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत, सर
जरा एकटेपणा वाटला
मोडून गेले घर
पण तुटला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून
फक्त, लढ म्हणा,
फक्त, लढ म्हणा।

          ही हिम्मत भारतातल्या शेतकर्‍यांना इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त शरद जोशींनी दिली. शरद जोशींचे खरे मोठेपण कोणते असेल तर अस्मिता गमावलेल्या आजच्या काळात त्यांनी शेतकर्‍यांना स्वाभिमान शिकवला. आणि बदलत्या भारताच्या संदर्भात हा मला अधोरेखित करावासा वाटणारा त्यांचा चौथा विशेष आहे.

          खरे म्हणजे शरद जोशींच्या संबंधी बोलण्यासारखे खूप काही आहे. गेली दोन वर्षे त्यांचे खूप साहित्य वाचतो आहे, त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना भेटतो आहे. त्यातून मला जाणवते की त्यांचे वेगळेपण अनेकांगी आणि अनेकस्पर्शी आहे. त्या सगळ्याची मांडणी एका व्याख्यानात करणे अशक्य आहे. पण आज मी मांडलेले सहा मुद्दे -- बिस्लेरीची बाटली आणि मोबाइल ही बदलत्या भारताची प्रतीके आणि शरद जोशींच्या मांडणीतील मी अधोरेखित केलेले अर्थवाद किंवा समृद्धी, तंत्रज्ञान, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान हे चार मुद्दे जरी आपण लक्षात घेतले तरी आपल्या लक्षात येईल, की चाकणच्या या कर्मभूमीमध्ये आपल्या विचारांची पेरणी करून ज्यांनी आपल्या संघटनेची उभारणी केली, ज्यांनी आपल्या आयुष्याची काही वर्षे इथल्या अंगारमळ्यात शेती करण्यात दिली, त्या माणसाचे योगदान हे केवढे मोठे आहे आणि आजच्या भारताला त्याची किती मोठी उपयुक्तता आहे हे सत्य आपल्याला जाणवल्याशिवाय रहाणार नाही.

                                                                                                                                                                                                      -  भानू काळे
                                                                                                                                                                                                      सी - २, गार्डन इस्टेट
                                                                                                                                                                                                      वायसलेस कॉलनीजवळ
                                                                                                                                                                                                      औंध, पुणे - ४११००७
                                                                                                                                                                                                      इमेलः bhanukale@gmail.com
*    *    *    *
(श्री. शरद जोशी यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त १ ते ३ सप्टेंबर २०१३ रोजी चाकण येथे चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय व श्री. अभिमन्यू शेलार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत अंतर्नाद मासिकाचे संपादक श्री. भानू काळे यांनी १ सप्टेंबर २०१३ केलेल्या भाषणाच्या शब्दांकनातून साभार. शब्दांकनः श्री. मनोज जायले (९८८१२०२९९४), अकोली (जहागीर), जि. अकोला)
*    *    *    *