नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीशरद जोशी शोधताना

शरद जोशी शोधताना

महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख सत्तेवर असताना, 'शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आणि त्या रोखण्यासाठी दिली जाणारी अनुदाने (पॅकेजेस)' या विषयावर अभ्यास करून, त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची एकसदस्यीय समिती गठित केली होती. त्यावेळी मी या समितीला एक अनावृत पत्र लिहिले. दै. केसरीच्या दि. २ जून २००८च्या अंकात ते पत्र छापून आले. या पत्रात समितीसमोर मी चार मुद्दे मांडले होते; ते असे :-

१. स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांच्या डोक्यावर (अर्थात ७/१२ वर) असलेली सर्व प्रकारची कर्जे ही अनैतिक आहेत असे शेतकरी संघटनेचे निश्चित म्हणणे आहे. त्यामुळे जे अनैतिक आहे ते मुळातून नष्ट केले पाहिजे, म्हणजेच शेतकऱ्याचा ७/१२ कोरा केला पाहिजे या संघटनेच्या मांडणीवर आपली समिती काय काम करते याला फार महत्त्व आहे.

२. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतीची समस्या सुटणार नाही; किंबहुना, आपल्या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची दिली जाणारी अनुदाने (पॅकेजेस), सोयीसवलती या मलमपट्ट्यांनी ही जखम बरी होणार नाही उलट, अधिकच चिघळण्याची शक्यता आहे या संघटनेच्या भूमिकेवर आपली समिती कोणते काम करते हेही महत्त्वाचे आहे.

३. कष्ट करणाऱ्या माणसाची आत्महत्या ही एक असाधारण गोष्ट आहे. कारण, हातापायाची बोटे सडून गळून गेलेला महारोगीसुद्धा जगण्याची धडपड करीत असतो. अश्या वेळी हातीपायी धडधाकट असणारा, घाम गाळणारा, कष्ट करणारा माणूस आत्महत्या करतो आहे या समस्येचे स्वरूप एका आर्थिक प्रश्नाशी (केवळ पॅकेजेसशी) जोडून विचार करणे परिपूर्ण होणार नाही असे समितीला वाटते का?

४. आज समाजात 'मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझ्या कुटुंबाचा प्रमुख व एकमेव उद्योग शेती हाच आहे' हे सांगण्याची लाज वाटावी अशी परिस्थिती या क्षेत्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने कोणती उपाययोजना आपली समिती सुचविणार आहे हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

आज हे आठवण्याचे कारण शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी दै. लोकसत्ताचे 'घराणेशाहीची गरज' हे संपादकीय. "शेतकऱ्यांची पुढची पिढी आज शेतातून निघून चालली आहे. ती शेतात राबण्यासाठी येतच नाही. आज देशासमोरील सर्वांत मोठी समस्या कोणती असेल, तर ती हीच आहे", अशी खंत ज्येष्ठ शेतीसंशोधक एम. एस. स्वामीनाथन यांनी व्यक्त केली. आणि 'शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला हा अघोषित संप देशाला अंधाराकडे घेऊन जाणारा असणार आहे' असे मत संपादकीयात व्यक्त झाले आहे. खरे तर, शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या मांडणीतून शरद जोशी यांनी अशा प्रकारच्या भविष्याची निश्चित शक्यता देशासमोर मांडण्याचा आकांत केला. विनाशाकडे चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी आणि पर्यायाने शेतकऱ्याला देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने जगता येईल अशी स्थिती निर्माण होण्याची गरज प्रतिपादन करून त्यासाठी संघटना उभारून अहिंसात्मक आंदोलनाचा मार्ग त्यांनी अवलंबला. आपल्या सर्वस्वाची होळी त्यांनी या लढ्यासाठी केली हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही.

अगोदरच्याच म्हणजे शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०१७ च्या दै. लोकसत्ताच्या अंकात स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्याचा वृत्तांत आला आहे. 'शेतकऱ्यांची कर्जमुक्ती' आणि 'शेतीमालाचा रास्त भाव' यासाठी रस्त्यावरचा लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या वक्तव्यात, विचार करायला भाग पाडणाऱ्या काही महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख राजू शेट्टी यांनी केलेला आहे हे निश्चित. त्या वक्तव्यात शरद जोशी यांचाही संदर्भ आला आहे म्हणून त्याची दाखल घ्यावी असे वाटले. अर्थात, त्यांनी व्यक्त केलेला निर्धार पोकळ ठरणार याचीही पूर्ण खात्री वाटते. कारण, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही Two men Army आहे. आणि सध्या हे दोन पहिलवान एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते दोघे, तमाम शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते स्वत:ला आता विद्वानही समजू लागले आहेत. निदान त्यात राजू शेट्टी यांचे वेगळेपण असे की, त्यांना जनतेने (त्यांच्या मतदारसंघातील) आपला प्रतिनिधी मान्य केले आहे. परंतु दुसरे नेते सदाभाऊ खोत हे विकत घेतलेल्या मंत्रीपदाने खूष होऊन आता लेखकही बनले आहेत. (अर्थात, मला स्वत:ला त्यांचा ग्रंथ वाचायला मिळाला नसल्याने त्याची खोली-रुंदी मला माहीत नाही.) आणि अलीकडे ते शरद जोशींनी सांगितलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिकारवाणीने मते व्यक्त करू लागले आहेत. त्याचा कसदारपणा भविष्यात आपल्या प्रत्ययाला येईलच. तर, दै. लोकसत्तामध्ये खासदार शेट्टी यांची साप्ताहिक लेखमाला सुरू आहे. सुरुवातीच्या दोनतीन लेखांत त्यांची शेतकरी आणि शेतीअर्थशास्त्र याविषयीच्या जाणकारीची झलक वाचायला मिळाली. आणि मागच्या आठवड्याच्या लेखात ते ललित लेखनाकडे वळले आहेत. (कारण काही थोडा स्वत:चा अनुभव आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितलेला आकडेवारीचा अभ्यास याच्या मर्यादा आहेत.) पुढे पाहू या, कोणते अर्थशास्त्राचे धडे ते देताहेत! आपण जे कोणी शरद जोशी यांचा वारसा निष्ठेने पुढे चालविण्याचा आभास निर्माण करीत आहोत (चालविण्याची धडपड करीत आहोत) त्यांच्यापाशी एवढेही सामाजिक व राजकीय वलय असल्याचे दिसत नाही.

------ दोन ------

संपूर्ण देशाला आणि संवेदनशील अखंड मानवजगताला धक्का देणारे एक वृत्त शनिवार दि. ४ मार्च २०१७ रोजी विविध दैनिकांत प्रसिद्ध झाले आहे. गुजराथमधील एका सेवाभावी संस्थेने तेथील शेतकरी आत्महत्या समस्येबाबत दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कामकाजाचा वृत्तांत त्यात देण्यात आला आहे. या याचिकेची व्याप्ती संपूर्ण देशासाठी करण्यात यावी असे नमूद करून न्यायालयाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे. पीकबुडीच्या आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याबाबत सरकार चुकीची पावले उचलत असल्याची टीका न्यायालयाने शुक्रवारी (३ मार्च २०१७) या कामकाजाच्या संदर्भात केली. देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल चिंता व्यक्त करत सरकार ही समस्या सोडवताना चुकीच्या दिशेने जात असल्याचे न्यायालयाने कठोर शब्दांत सुनावले. ही समस्या आत्यंतिक महत्त्वाची असून, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना केवळ आर्थिक नुकसानभरपाई देणे हा यावर उपाय नसून त्यासाठी सरकारने तातडीने निश्चित धोरण आखण्याचे आवश्यक असल्याचे न्यायालयाने केंद्राला सुनावले. गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत असून त्यामागची कारणे शोधण्याची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जर हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवला तर शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने बऱ्याच चांगल्या गोष्टी साध्य करता येऊ शकतील. मृत्यूनंतर आत्महत्याग्रस्तांना मदत करण्याऐवजी हा प्रकार थांबवण्यासाठी धोरणे राबवावी असे मुख्य न्यायाधीश जे. एस. केहर यांच्या खंडपीठाने सरकारला सुनावले.

गेली ३०-३५ वर्षे शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून आणि वेगवेगळ्या आंदोलनांतून हीच भूमिका देशासमोर मांडली. 'स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेली सर्व प्रकारची कर्जे ही बेकायदेशीर व अनैतिक आहेत', 'शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव द्यावा' आणि 'आम्हाला भीक नको, तर घामाचे दाम हवे' ही संघटनेची मागणी असून कर्जबाजारीपणावरील उपाय म्हणून दिली जाणारी सरकारी अनुदाने व अन्य प्रकारच्या सोयीसवलती यामुळे ही समस्या चिघळण्याची शक्यता अधिक असल्याचे द्रष्टे विचारवंत शरद जोशी यांचे भाकित किती खरे होते हेच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील कामकाजातून स्पष्ट झाले आहे. आपल्या मागण्यांसाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने केलेली आंदोलने राज्य सरकारांनी कठोर उपायांनी मोडून काढली. आंदोलकांचे अनन्वित छळ त्यासाठी करण्यात आले. अनेक शेतकरी या कारवाईत बळी पडले. खरे तर यासाठी त्या त्या वेळी सत्तेवर असलेल्या सरकारांवर हत्येचे गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि त्यासाठी जबाबदार धरून कठोर शिक्षा केल्या पाहिजेत. आणि अश्या विपरीत परिस्थितीतही शेतकरी व कष्टकरी यांच्या परिश्रमांचे श्रेय घेऊन जे सर्वोच्च सरकारी सन्मान स्वीकारण्यास धजावतात त्यांच्या बेशरमपणाची त्यांना लाज वाटली पाहिजे. लक्षावधी मायभगिनींच्या पांढऱ्या कपाळांवरचे ललाटलेख ज्यांच्या नालायक कर्तृत्वाचे फलित आहेत त्यांनी आपल्या दळभद्री कामाची शरम म्हणून ते पुरस्कार परत करून थोडेफार प्रायश्चित्ततरी घेतले पाहिजे.

------ तीन ------

माझ्या भावांनो आणि बहिणींनो,

शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर २००८मध्ये औरंगाबादला आणि त्यानंतरचे नोव्हेंबर २०१३मध्ये चंद्रपूरला अशी दोन अधिवेशने झाली. या दोनही अधिवेशनांची घोषणा होती 'पुन्हा एकदा उत्तम शेती.' २००८ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी या नेत्याने स्वत: दौरा करून शेतकरी भावांना आणि मायबहिणींना निमंत्रित केले. शेतीक्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची, जैविक बियाण्यांची ओळख करून देऊन आपल्या पाईकांची दृष्टी व्यापक व्हावी या उद्दिष्टपूर्तीसाठी घेण्यात आलेले औरंगाबादचे अधिवेशन कारणी लागावे म्हणून त्यांनी परिश्रम केले. २०१३मध्ये चंद्रपूर येथे झालेल्या अधिवेशनात 'स्वतंत्र भारताचे नैतिक दर्शन' आणि 'शेतकरी संघटनेचे नैतिक दर्शन' या आपल्या मांडणीतून कृषिअर्थशास्त्राचे व्यापक स्वरूप आणि त्याचबरोबर व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत ठेवण्याची संघटनेची बुद्धिवादी तर्ककठोर विचार- व आचारपद्धती त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

'पुन्हा एकदा उत्तम शेती' या बीजमंत्राचा आयुष्याच्या अखेरच्या कालखंडात शरद जोशी यांनी पुनरुच्चार करून देशाला निश्चितपणे एका नव्या क्रांतीसाठी हाक घातली आहे. शेतकरी संघटनेच्या बांधणीची झालेली वाताहत आणि संघटनेच्या पाइकांनी मूळ उद्दिष्टांकडे फिरवलेली पाठ यामुळे शरद जोशी जरी व्यथित झाले तरी आपल्या जबाबदारीचे आणि ध्येयाचे भान यातून त्यांनी या मार्गाचा अवलंब केल्याचे दिसून येते. कदाचित, शिवरायांप्रमाणे दोन लढायांच्या मधल्या काळात आपल्या सैनिकांच्या हाताला काम दिले नाही तर ते स्वत:साठी आणि समाजासाठीही घातक ठरू शकतील असेही त्यांना वाटले असावे.

या बीजमंत्राचा व्यापक अंगांनी विचार करून शेती विकासाच्या दृष्टीने पाया भक्कम करून देशाच्या संपन्नतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण फायद्यासाठी त्याचा कसा उपयोग होईल यासाठी अभ्यास करण्याची आवश्यकता लक्षात घेणे गरजेचे आहे.

शरद जोशी यांनी एक अभूतपूर्व आंदोलन उभारले ते त्यांच्या अंगाच्या काही गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर. भविष्यकाळात अतिशयोक्ती वाटतील असे घटनाप्रसंग संघटनेच्या चळवळीत घडले आहेत. मी स्वत:ही त्याचा साक्षीदार आहे. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात संघटनेची अधिवेशने झाली. या अधिवेशनांत खुल्या मैदानांत लाखोंच्या संख्येने संघटनापाईक स्त्री-पुरुष विविध राज्यांतून एकत्र जमत. शरद जोशी नावाचा एक अवलिया अर्थशास्त्रज्ञ व्यासपीठावरून अर्थशास्त्रातले अवघड विषय त्यांना समजावून सांगत असे. मला वाटते गांधी-नेहरू यांनाही अश्या महासभा लाभल्या नसाव्यात. ही केवळ गर्दी होती असेही नाही. उदाहरणेच घ्यायची झाली तर, परभणीचे दुसरे अधिवेशन, चांदवडचे महिला अधिवेशन, औरंगाबादचे 'प्रचीतीचे देणे' अधिवेशन. कृषिअर्थशास्त्राची मूलतत्त्वे, महिलांचे संपत्तिअधिकार व त्याअनुषंगाने 'लक्ष्मीमुक्ती'ची तयारी, गॅट करार यांसारख्या विषयांवरील शरद जोशींचे विवेचन मैदानावरील लाखो अशिक्षित, अर्धशिक्षित पाईक अभ्यासपूर्वक ग्रहण करीत असत. ज्या वेळी गॅट करार, डंकेल ड्राफ्ट या विषयांत विद्यापीठांतले उच्चशिक्षित चाचपडत होते त्या वेळी औरंगाबादच्या खुल्या मैदानावर लाखो अर्धशिक्षित व अशिक्षित पाईक जागतिक बाजाराची चर्चा करीत होते. पुढे तर, या ज्ञानसत्रांत तयार झालेल्या संघटना पाइकांनी विद्यापीठांतील मंडळींना गॅट करार आणि डंकेल ड्राफ्ट समजावला हे आपण पाहिले आहे. हा चमत्कार शरद जोशीच करू शकले.

शरद जोशी संपूर्णपणे अभ्यासण्याची आपल्या सर्वांनाच गरज आहे हे त्यातून स्पष्ट दिसून येईल. यापूर्वीची अधिवेशने आणि मेळावे यामध्ये रस्त्यावरच्या आंदोलनासाठी कार्यक्रम देणारे लढाऊ नेतृत्व आणि अखेरची दोन अधिवेशने यामध्ये दिसणारे नेतृत्व यातला फरक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. कदाचित, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या कारणांमुळे संघटनेतून अनेक नेते व कार्यकर्ते बाहेर पडले आणि संघटनेची लढण्याची शक्ती क्षीण झाली. नवीन लढाऊ नेतृत्व तयार होऊ शकले नाही. याचाही परिणाम पुढच्या वाटचालीत झालेला दिसतो. मूळचे संघटनेचे स्वरूप बदलले. स्वत: शरद जोशी यामुळे व्यथित झाले.

'दुर्दैवाने काही मंडळी व्यक्तिश: माझ्याबद्दल कटुता बाळगून वेगळी झाली. त्याबद्दल मात्र मला खूप दु:ख होतं. माझ्या हातून, कदाचित, काही चुकलं असेल. मी स्वत: त्यांच्यातल्या अनेकांच्या घरी जावून, त्यांना भेटून त्यांची क्षमा मागितली आहे आणि त्यांनी पुन्हा संघटनेत यावं असं जाहीर सभांमधूनही सांगितलं आहे.' अशा शब्दांत जाहीरपणे माफीनामा व्यक्त करण्याचा शरद जोशी यांनी प्रयत्न केला. संघटनेचे नुकसान होऊ नये असा त्यांचा त्यामागे प्रामाणिक हेतू होता. तथापि, आम्हा सगळ्यांचा व्यक्तिगत अहंकार वरचढ ठरला आणि संघटना आणखी क्षीण होत गेली. शेतकरी समाजाचे व्यापक हित त्यामुळे धोक्यात आले. शरद जोशी यांच्यासारख्या महान विचारवंत नेत्याचा माफीनामा बेदखल वाटण्याइतके आम्ही कठोर (मुर्दाड?) बनलो!

या संदर्भात, संघटनेतल्या दोन घटनांचा उल्लेख महत्त्वाचा वाटतो. संघटनेत ज्या वेळी फाटाफूट सुरू झाली त्या वेळी व्यथित होऊन एका कार्यकर्त्याने प्रामाणिक हेतूने शरद जोशी यांना पत्र लिहिले. संघटनेतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्याची व त्यांच्याशी बोलून त्या सर्वांना पुन्हा एकत्र येण्यासाठी विनंती करण्याची परवानगी आपल्याला मिळावी अशी भावना त्याने त्या पत्रात व्यक्त केली. माझ्या निश्चित माहितीप्रमाणे शरद जोशी यांनी त्या कार्यकर्त्याला तशी संमती दिली होती. त्या प्रयत्नातून काय झाले हे जरी समोर आले नसले तरी शरद जोशी यांची इच्छा त्या घटनेतून दिसल्याशिवाय रहात नाही.

दुसऱ्या घटनाप्रसंगी, श्रीरंगनाना मोरे यांच्या अमृतमहोत्सव सत्कारसमारंभातील भाषणात शरद जोशी म्हणाले, "तुमच्यापैकी कोणाच्या मनात असं असेल की शेतकरी संघटनेत तुम्हाला योग्य तो मान मिळाला नाही किंवा सावत्रपणाची वागणूक दिली गेली, तर श्रीरंगनानांच्या साक्षीने मी कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी चूक मानतो, तुमची माफी मागतो आणि 'परत या' अशी हाक देतो." इतके होऊनही आमची बधीरता कायम राहिली आहे.

"मला सरकारांनी मी बुद्धिवान आहे म्हणून नाही बोलावलं, मी हाक मारली की तुम्ही शेतकरी लाखोंच्या संख्येने जमता, प्रसंगी लाठ्यागोळ्या खाण्याच्या, तुरुंगवास भोगण्याच्या तयारीने जमता या ताकदीची दखल घेऊन त्यांनी मला बोलावलं आहे" अशा शब्दांत संघटनेची एकजूट, संघटनेची ताकद किती महत्त्वाची आहे याची जाणीव अनेकदा शरद जोशी यांनी वेगवेगळ्या अधिवेशनांत आपल्याला करून दिली आहे.

आपण एक ऐतिहासिक लढा लढतो आहोत. या लढ्याला त्यांनी 'दुसरे स्वातंत्र्ययुद्ध' घोषित केले इतकेच नाही तर या लढ्यात जागतिक-वैश्विक लढ्याची बीजे आहेत हेही सांगितले. हे समजून घेण्यात आम्ही सर्वजण कमी पडलो. केवळ उदात्त तत्त्वज्ञान किंवा विचार महत्त्वाचे नाहीत तर लोकशाही व्यवस्थेमध्ये त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यापाठीमागे संघटनेची ताकद उभी करणे आवश्यक असल्याचे शरद जोशी यांचे म्हणणे समजून घेण्यास आणि कृतीत उतरवण्यास आम्ही नालायक ठरलो.

या संदर्भात, राजकीय हेतूंनी संघटनेतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची-नेत्यांची आजची स्थिती अभ्यासण्यासारखी आहे. त्यातले काहीजण केवळ भाषणबाजी आणि वेगवेगळ्या चॅनेलवरच्या चर्चांसाठी उपयोगी ठरत आहेत. बाकी इतरांचे अस्तित्वही आज कुणाला जाणवत नाही. किंबहुना, ते दखलपात्रही राहिलेले नाहीत. मला वाटते, आज जे कोणी या दृष्टीने उठाठेव करीत आहेत त्यांच्याही वाट्याला हाच भोग येणार आहे. यातून एक मात्र झाले की यातल्या बहुतेकांची स्वत:ची गरिबी दूर झाली आहे. मात्र संघटनेला आणि एका महान नेतृत्वाला त्यांनी घायाळ केले; त्यांना पराभूत ठरण्यासाठी ते कारणीभूत झाले हे त्यांचे ऐतिहासिक पाप ठरणार आहे.

वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, डबक्यातल्या बेडकाने कितीही फुगून मोठे होण्याचा प्रयत्न केला तरी तो बैलाइतका मोठा होऊ शकणार नाही. तशा प्रयत्नात फुटून त्याचा घातच ठरलेला आहे. एवढे तरी शहाणपण त्यांनी घ्यायला पाहिजे असे वाटते.

------ चार ------

नास्तिक असलेल्या युवक नरेन्द्राचे रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून उच्चस्थानी विराजमान झालेले विवेकानंद रूपांतर आणि जीवनातील सर्व भौतिक साधनांची उपलब्धता जाणीवपूर्वक अव्हेरून हालाखीचे जीवन स्वीकारून जगाच्या अर्थशास्त्राला कृषिकेंद्रित वेगळे परिमाण देणारे अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांच्या जीवनप्रवासातील साम्य मला उल्लेखनीय वाटते. 'जगाला दीड हजार वर्षे पुरेल एवढे विचारधन मी देऊन ठेवले आहे' असे आत्मविश्वासाचे उद्गार स्वामी विवेकानंद यांनी स्वत:विषयी काढले आहेत.

"शेतकऱ्यांचे शोषण न होता जलद आर्थिक विकास होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी माझा लढा आहे. महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्यांचा असूड'मध्ये जे सांगितले त्यामध्ये आणि आज मी जे काही सांगतो आहे त्यामध्ये काहीही फरक नाही. फक्त फुल्यांच्या नंतर हा विचार प्रथमच पुढे येतो आहे, आणि मी तो अर्थशास्त्रीय परिभाषेत मांडतो आहे. एक ऐतिहासिक लढा आपण लढतो आहोत. यामधून जगाच्या आर्थिक जडणघडणीला नवी दिशा मिळणार आहे." शेतकरी संघटनेच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच शरद जोशी यांनी आत्मविश्वासाने मांडलेल्या या विचाराची प्रचीती आपण घेत आहोत. दीर्घ काळ शरद जोशी यांनी मांडलेल्या विचारांची दखल या देशाला घ्यावी लागणार आहे हे निश्चित.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नोव्हेंबर २००८मध्ये लिहिलेल्या आपल्या एका लेखात या आंदोलनाच्या संदर्भात नोंदवलेले निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात ते म्हणतात, "एक विचारधारा आणि त्यातून निर्माण झालेल्या या आंदोलनाची केवळ भारतातच नव्हे तर जगभर कमी-अधिक प्रमाणात चर्चा झाली. कारण हे जगाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व आंदोलन होते. आणि या आंदोलनाचा अभ्यास करावयास आणि त्यात सामील व्हावयास जगभरचे पत्रकार आणि कार्यकर्ते भारतात आले होते. गोलान हाईट्सला आपल्या ट्रॅक्टर्सचा वेढा घालून शेतीमालाला रास्त भाव मागणारे इस्रायली शेतकरी 'लाँग लिव्ह शरद जोशी' हा नारा देत होते."

शरद जोशी यांना 'शेतकऱ्यांचे पंचप्राण', 'महामानव' अश्या उपाधि आम्ही संघटना पाईकांनी आणि तमाम शेतकऱ्यांनी बहाल केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्यांच्या अनुयायांनी अशीच 'महामानव' उपाधि दिली आणि त्याचा उदोउदो आपण गेली अनेक वर्षे ऐकतो आहोत. आजची त्यांच्या अनुयायांची परिस्थिती व वागणूक मात्र अत्यंत विपरीत आहे. प्रत्येकजण आपण मांडतो आहोत ते आंबेडकर हेच खरे आणि मी त्यांचा वारसा पुढे चालवणारा खरा असे समजून इतरांच्या नावाने बोंबाबोंब करतो आहे. डॉ. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या संघटना, पक्ष यांची लांडगेतोड सुरू आहे. एक प्रकारे त्यांचे तत्त्वज्ञान आणि विचार यातील आपापल्या सोयीचे तुकडे विकून स्वत:चा वैयक्तिक स्वार्थ साधण्याचेच काम त्यातून होताना दिसते. या महान नेत्याने जे व्यापक समाजहित आणि देशहित गृहीत धरून जीवन समर्पित केले त्याची पर्वा या अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांना नाही असेच म्हणावे लागते. हा संदर्भ यासाठी नमूद केला कारण आम्हीही आता याच मार्गाने जाणार आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे. इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे असे म्हटले जाते. पण ते कोणत्या अर्थाने आपण घेणार आहोत? संघटनेत राहून योग्य वाटचाल करून संस्थापकाने दाखवलेल्या मार्गाने व्यापक हितासाठी वाटचाल करीत, का त्याच नेतृत्वाचे लचके तोडून स्वार्थासाठी त्यांचा बाजार मांडून? याचा आताच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दिवंगत साहित्यिक प्रा. अरविंद वामन कुळकर्णी यांनी 'साप्ताहिक माणूस' साठी (१४ मार्च १९८१) लेख लिहिला. त्यात डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी यांच्या संबंधाने तुलनात्मक लिखाण केले आहे. त्या लेखात प्रा. कुळकर्णी लिहितात, "नेहमीच्या मराठी पठडीला जागून शरद जोशी यांची खिल्ली उडविण्याचे कर्म जवळजवळ सर्व मराठी पत्रकारितेने केले. भारतात सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक गळचेपी चव्हाट्यावर मांडावी, त्यांच्यासाठी न्याय मागावा हे अर्थशास्त्राला आजवर सुचले नाही. हे सारे छातीठोकपणे सांगणारा आणि, नुसते आपल्या केबिनमध्ये बसून न सांगता, त्यासाठी आवश्यक ती जागृती करणारा, संघटना उभारणारा शरद जोशी हा पहिला नि खराखुरा शेतकरी नेता आहे. आज कदाचित अतिशयोक्तीचा आरोप होईल; पण तो पत्करूनही असे म्हणावेसे वाटते की दलितांना डॉ. आंबेडकरांच्या रूपाने जसा पहिल्यांदा सर्वार्थाने नेता लाभला, तसाच या शरद जोशींच्या रूपाने आज शेतकऱ्यांना नेता लाभला आहे." या तुलनेमागचा हेतू लक्षात घेणे मात्र महत्त्वाचे आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाग्य असे की, त्यांना आपल्या लाखो सर्वसामान्य अनुयायांच्या अंत:करणात अढळ स्थान प्राप्त झाले. आज त्यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांच्या स्मृतिस्थळापाशी नतमस्तक होऊन नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शरद जोशी यांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही उपेक्षाच वाट्याला आली असे म्हणावे लागेल. गतवर्षी शरद जोशी यांचा अंत्यविधी पुण्यात झाला. अंत्यविधीप्रसंगी संघटना पाइकांची जी उपस्थिती होती ती शरम वाटावी इतकी कमी होती. आमच्या कृतघ्नपणाचा कळस म्हणजे त्याही प्रसंगी मानपानाची नाट्ये सुरू असल्याचे जाणवत होते. इतिहासाला कलाटणी देण्याचे कर्तृत्व ज्या विचारवंताने सिद्ध केले, 'माझ्या देशांतील उपेक्षित शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला सन्मानाने जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळावे' यासाठी ज्याने सर्वस्व पणाला लावले त्या महान व्यक्तित्वाला आपल्या परलोक प्रवासाच्या खर्चाची व्यवस्था स्वत:लाच करावी लागली याच्या इतकी शरमेची बाब काही असेल असे वाटत नाही. आणि आज लगेचच आम्ही वारसाहक्कासाठी ऊर बडवून घेत आहोत. हे दुर्दैव त्या नेत्याचे की आम्हा दळभद्री वारसांचे? याची कठोर चिकित्सा होण्याची गरज आहे.

आपण हाती घेतलेले कार्य किती कठीण आहे याची शरद जोशी यांना निश्चित जाणीव होती. आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आणि आपल्या संघटना पाइकांनीही या कार्यासाठी आज काही त्यागाची तयारी ठेवली पाहिजे अशी रास्त अपेक्षा त्यांनी ठेवली असणारच. संघटनेचे अंतिम लक्ष्य आणि त्यासाठी करावी लागणारी कठीण वाटचाल याची मांडणी अत्यंत परखडपणे शरद जोशी यांनी संघटनेच्या व्यासपीठावरून व लिखाणातून वारंवार व्यक्त केली आहे; त्याच बरोबर एक माणूस म्हणून आपल्या मर्यादा कोणत्या आहेत याचीही पुरेपूर चिकित्सा केली आहे.

कोणतीही व्यक्ती ही माणूस म्हणून काही आनुवंशिक गुणदोष घेऊनच जन्माला येते. अपवादानेच ते मूळातून नष्ट केले जाऊ शकतात, हे लक्षात घ्यावे लागते. त्यामुळे शरद जोशी यांच्या संबंधाने काही आमचे वैयक्तिक मतभेदाचे कारण घडू शकते. तथापि, शरद जोशी यांच्यासारख्या महान व्यक्तित्वाचे दोष दाखविण्याची आपली पात्रता ज्याने त्याने नीट तपासून पाहिली पाहिजे. म्हणजे सुधारण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. 'स्वातंत्र्याची उपासना करीत असताना नरक जरी मिळाला तरी तो स्वर्गापेक्षा मौल्यवान आहे' या तत्त्वाने सतत शोध घेणाऱ्या शरद जोशी यांचा शोध आपल्या कवेत सापडणे अवघड आहे असे म्हणावेसे वाटते.

शरद जोशींचे दुर्दैव म्हणावे लागेल की, ज्या समाजघटकांसाठी त्यांनी आंदोलन उभारले त्यांना वाचन, अभ्यास आणि चिकित्सा यांचे वावडे राहिले आहे. संघटनेच्या मुखपत्राची आणि एकूणच साहित्याची जी परवड झाली ती आपण अनुभवली आहे. शरद जोशी जे काही लिहीत होते, सांगत होते ते सर्वांपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा एवढ्या दीर्घ कालावधीत आम्ही उभारू शकलो नाही. सगळा इतिहास पुन्हा इथे मांडण्याची गरज नाही. आणि म्हणून, स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, "एकाच व्यक्तीने दार्शनिक, नेता, संघटक, कार्यकर्ता या भूमिका करणे शक्य नसते. त्यामुळे विचारांचे, संघटनेचे आणि आंदोलनाचे अपरंपार नुकसान होते." यातून काही धडा पुढच्या काळासाठी आम्ही घेणार आहोत की नाही याचा विचार होण्याची गरज आहे. परिस्थितीची गरज म्हणून शरद जोशी यांना या भूमिका अंगावर घ्याव्या लागल्या असतील. मात्र आमच्यापैकी कुणाची तेवढी पात्रता आहे का याचाही विचार झाला पाहिजे असे वाटते. "एकाच मठातून दोन महात्मे निर्माण होत नाहीत; किंबहुना, कुठल्याही एका ग्रंथातून सर्व काळाच्या सर्व समस्यांची उत्तरे मिळू शकत नाहीत, त्यासाठी 'सावध ऐका पुढल्या हाका' याप्रमाणे जागरूक राहून कार्य सुरू ठेवावे लागेल." असे सांगून स्वत: शरद जोशी यांनी ही जाणीव ठेवली आणि आम्हालाही तशी करून दिली आहे.

शरद जोशी आणि शेतकरी संघटना यांचे एक चिकित्सक अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या एका लेखात (शेतकरी संघटना ११ वे अधिवेशन स्मरणिका २००८) म्हटले आहे, "शेतकरी संघटनेचा आज परतीचा प्रवास सुरू आहे असे वाटते. अनेक कार्यकर्ते सैरभैर झालेत व बाहेर पडलेत. काही सवते सुभे आहेत. मात्र प्रत्येकाच्या मनात शरद जोशींनी फुलविलेला जळता निखारा तसाच आहे." आज २०१७ साली अत्यंत खेदजनक अशी स्थिती आहे; जळता निखारा जवळजवळ विझत आला आहे. सगळ्यांनीच आपापल्या मर्यादा ओळखून शुद्धीवर येण्याची गरज आहे. स्वत:ला शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे पाईक म्हणविणारे आम्ही गेली अनेक वर्षे एकही नवीन कार्यक्रम संघटनेला देऊ शकलेलो नाही. शरद जोशी यांच्या निधनानंतर दोनतीन बैठका झाल्या, कोणताही अजेंडा नसताना या बैठका झाल्या. नवीन कार्यक्रम जाहीर झाला नाही. जणू काही शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटले आहेत इतकी शांतता आहे. शरद जोशी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या अधिवेशनात त्यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. ('अंतर्नाद'चे संपादक भानू काळे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हा चरित्रग्रंथ सिद्ध केला त्याबद्दल संघटना पाईक आणि शरद जोशीप्रेमी सदैव त्यांचे ऋणी रहातील.) २-३ शाळकरी मुलांना व्यासपीठावर बोलावून संघटनेचा बिल्ला लावण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला. अधिवेशनाची उपस्थिती पहाता संघटनेच्या मतभेदांचे उत्तम दर्शन झाले. केवळ काहीतरी दाखवायचे म्हणून असे कार्यक्रम घेतल्याने संघटना वाढणे राहोच, संघटना कमकुवत करण्यासच ते कारणीभूत ठरतील. त्यामुळे ही एक प्रकारे आत्मवंचनाच होईल. आणि संघटनेतल्या जबाबदारीमुळे, कामामुळे माझे नुकसान झाले असे म्हणून आम्हाला जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही याची जाणीव प्रत्येकाने करून घेऊन आपापले वैयक्तिक काम आणि जबाबदारी निभावण्यासाठी संघटनेतले काम थांबविण्याची तयारी ठेवावी लागेल. मी वैयक्तिक माझ्याकरिता या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, संघटनेची एकजूट होणार नसेल आणि मतभेद व मनभेद मिटणारच नसतील तर राज्य कार्यकारिणीचा सदस्य म्हणून माझे नाव समाविष्ट केले जाते, ते यापुढे छापले जाऊ नये.

डॉ. दाभोळकर म्हणतात त्याप्रमाणे निर्माण झालेले सवते सुभे प्रथम बंद करावे लागतील. स्वत:च्या मतलबापुरते मोडूनतोडून सोयीस्कररित्या शरद जोशींचा वापर करण्याचे थांबवावे लागेल. शरद जोशी यांच्या भावनांचा आम्ही त्यांच्या जिवंतपणी आदर केला नाही तरी आज त्यांच्या निधनानंतर संघटनेच्या व्यापक हितासाठी करणे सर्वांच्याच आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार आहे याची जाणीव ठेवावी लागेल. आणि इतके जमणारच नसेल तर दुसरा शरद जोशी येण्याची वाट पहात प्रत्येकाने स्वहिताचा उद्योग चालू ठेवणे श्रेयस्कर ठरेल.

'कर्जमुक्त शेतकरी मला डोळ्यांनी पहायचा आहे', 'शेतकऱ्याची आत्महत्या थांबवता येत नाही याची वेदना मला बेचैन करते' असे घोकत या नेत्याने अखेरचा श्वास घेतला. आयुष्याच्या अखेरच्या तीनचार वर्षांत शरद जोशी अस्वस्थ मन:स्थितीत होते असे जाणवल्याशिवाय राहिले नाही. आपल्या सर्वस्वाचा त्याग करतानाही ही अस्वस्थता काही यापूर्वी दिसली नव्हती. संघटनेच्या भावी वाटचालीची दुर्बलता त्यांना अस्वस्थ करीत असावी असे निश्चितपणे म्हणता येईल. आणि याच एका वेगळ्या मन:स्थितीत त्यांनी न्यासाच्या निर्मितीचा आणि इच्छापत्र करण्याचा निर्णय केला असावा असे म्हणण्यास वाव आहे.

------ पाच ------
आम्ही स्वत:ला शरद जोशींचे खरे वारसदार म्हणवून घेणार असू तर त्यासाठी शरद जोशींची संघटना तिच्या मूळ ध्येयाकडे वाटचाल करत भक्कमपणे उभी करावी लागेल. त्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम हाती घ्यावा असे सुचवावेसे वाटते.

१. सर्वांनीच व्यक्तिगत अहंकार थोडे बाजूला ठेवून, किंबहुना सोडून देऊन संघटना पुन्हा एकसंध उभी करणे.
२. शेतकरी संघटना न्यासाची सर्वसमावेशक पुनर्रचना करणे.
३. शरद जोशींनी न्यासाला दिलेल्या जागेवर शेतकरी हुतात्म्यांचे, शरद जोशी यांनी पुकारलेल्या 'दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धा'चे स्मरण देणारे आणि भविष्यातल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला कायम प्रेरणादायी होईल अशा प्रकारचे उचित व समर्पक स्मारक उभारणे.
४. या ठिकाणी शरद जोशी यांच्या नावाने अध्यासन निर्माण करून त्याद्वारे समग्र शरद जोशी विविध माध्यमांतून देशासमोर व जगासमोर मांडणे.

- शाम पवार, महाळुंगे (इंगळे)
जि. पुणे
(पूर्वप्रकाशित-अंगारमळा अंक २)