नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीशरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार

शेतकरी संघटनेचे प्रणेते
मा. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

                मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला 'जीवनगौरव' पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साकल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार करून कृतिशील चळवळ उभारणार्‍या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानने यंदाचा सामाजिक 'जीवनगौरव' पुरस्कार श्री. शरद जोशी यांना मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली.

                यावेळी शरद जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतांना श्री अनंत दीक्षित म्हणाले की, आजची ही संध्याकाळ देशाच्या दृष्टीने मौलिक अशी आहे. "एकच दिसतो समोर तारा, परी पायतळी अंगार’’ असे कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेय, आज शरद जोशींना दिला जाणारा चतुरंग पुरस्कार लोकांमधून आलेला असल्याने हा पुरस्कार मोठा आहे, या पुरस्काराला औचित्य आहे; तरी देखील शरद जोशींचा देशपातळीवर मोठा गौरव होण्याची आवश्यकता होती, असे मला वाटते. अर्थात गौरव, पुरस्कार, समारंभ व मान्यता याच्या पलीकडे ते गेलेले आहेत.

                इंडिया विरुद्ध भारत या संकल्पनेने पेटंट शरद जोशींनी घ्यावे, अशा तर्‍हेची मूलभूत संकल्पना त्यांनी समाजाला दिली. एकीकडे बदलणारा भारत दिसतो, एकीकडे न बदलणारा भारत दिसतो; एकीकडे इंडियात अनूवीज ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची भारताची ताकद किती आहे, हे सांगितले जाते तर दुसरीकडे भारतात गाव हागणदारी मुक्त करण्यार्‍या योजनांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असते. हा जो भारत आहे, त्या भारताचे दुखणे आणि नासणे कशात आहे, हे सांगणे फार अवघड आहे. अशा या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये गौरवशाली व प्रभावशाली कार्य शरद जोशी यांनी केले आहे. समाज पुढे यावा यासाठी प्रसंगी अपयशांना देखील सामोरे जाऊन आयुष्यभर काम करणे जिकिरीचे जरी असले तरी शरद जोशींनी यशस्वीपणे निभावले आहे.

                तीस वर्षापूर्वी निपाणीला जेव्हा तंबाखूचे आंदोलन झाले, तेव्हा मला जोशींच्या कार्याविषयी पहिल्यांदा जवळून ओळख झाली. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा, हे कुणाच्या हातात नसते. पण आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये शरद जोशींचा जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर ज्यांच्या बाबतीत जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही, असे पहिले नाव म्हणजे श्री दांडेकर, दुसरे श्रीपाद डांगे, तिसरे आचार्य प्र.के. अत्रे आणि चौथे नाव म्हणजे शरद जोशी. शरद जोशींचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. जितक्या सहजतेने ते शेतकरी समाजाशी मराठीमध्ये संवाद साधतात तितक्याच सहजतेने त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये विदेशात भाषणे केलेली आहेत. त्यांना संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक व्हायचे होते. खरे तर शरद जोशी हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मनुष्य शब्दाने, वर्णनाने किंवा वाचनाने समजेलच असेही नाही. हे व्यक्तिमत्त्व कुठल्यातरी साच्यात बसवता येणे कठीण आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात शब्दांना झेपतातच असे नाही, त्याला कृतिशीलतेची सांगड असावी लागते. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि चंदिगढ पासून उत्तरप्रदेशापर्यंत विविध शेतकरी आंदोलनांचे नेतृत्व करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा उपयोग करून या शेतकरी योद्ध्याने अनेक चमत्कारिक गोष्टी लीलया साध्य केलेल्या आहेत. मोठमोठ्या अर्थशास्त्र्यांना समजायला कठीण जाईल असे अर्थशास्त्र शेतकर्‍यांना अगदी सहजतेने समजावून सांगण्याचा चमत्कार शरद जोशींनी घडवून आणला आहे. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की "सोप्यात सोपी गोष्ट कारण नसताना अवघड करून सांगतात त्यांना विद्वान असे म्हणतात" आणि "अवघडातील अवघड गोष्ट जे सोपी करून सांगतात, त्यांना संत असे म्हणतात." हा संतत्वाचा प्रभाव शरद जोशींमध्ये आहे म्हणूनच त्यांना ऐकायला लाखोंनी महिला देखील स्वखर्चाने त्यांच्या भाषणाला गर्दी करतात. भाषिक दृष्ट्या अस्मिता हरवलेला आणि दुभंगलेला समाज, जात, धर्म, भाषा, प्रांत आणि प्राचीन धर्म-परंपरेच्या अस्मिता दर्शक गोष्टीपासून पूर्णपणे अलिप्त राहणारा पण रोजच पराभूत होणारा सामान्य माणूस जात-भाषा-धर्मवादी नाही, ही भूमिका जाहीरपणे घेऊन लोकसंगठन करण्याचे ऐतिहासिक कार्य शरद जोशी यांनी महाराष्ट्रात केलेले आहे.

                कुठल्याही विषयावर मूलभूत आणि मूलगामी विचार करणे, हे आजच्या विचारप्रक्रियेच्या बाजारपेठेत अडचणीचे ठरत चाललेले असताना, लोकांना रुचेल तेच बोलायचे, अशी सर्वसाधारण पद्धत रूढ झालेली असल्यामुळे आपण आपली स्वतःची ओळख करून घेणेच विसरून गेलो होतो. अशा विपरीत स्थितीत शरद जोशींनी समाजाला स्वतःची ओळख करून घ्यायचे शिकविले, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोलाची बाब आहे. शरद जोशी म्हणतात की, प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणीवांचे आणि अनुभवांचे जग व्यापक करण्याच्या धडपडीत असतो. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी आणि प्रत्येक निवडीच्या वेळी अनेक विकल्प उपलब्ध व्हावेत, याचा शोध घेण्यासाठी मनुष्यप्राणी धडपडत असतो आणि हा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा असतो. शरद जोशी असेही म्हणतात की, सत्यापेक्षा स्वातंत्र्याचे मोल जास्त असते. इतिहासाकडे बघितले तर असे दिसून येते की, समाजाला स्वतःचे योग्य स्थान मिळवून देण्याच्या महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लढाईच्या रणांगणातील शरद जोशी हे श्रेष्ठ लढवय्ये आहेत.

                सत्काराला उत्तर देताना शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणाले की, आज मला बरेच दिवसानंतर काठीचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहून बोलताना पाहून माझ्या सर्व शेतकरी सहकार्‍यांना आनंद वाटत असेल. अलीकडे मला उठून उभेही राहता येत नाही, खुर्चीवर बसून बोलत असतो पण आज मी सर्वांना सांगतो की, जोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः: कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही.

                माझ्या संबंध सामाजिक कार्याची सुरुवात मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा "सेकंड डेव्हलपमेंट डिकेड" म्हणजे त्यांच्याकडे पंचवार्षिक योजनांऐवजी दहा वर्षाच्या योजना असतात, त्या समितीचा मी सदस्य होतो, तेथूनच झाली. त्या समितीच्या सदस्याच्या भूमिकेतून मी वेगवेगळ्या विशेषकरून लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा दौरा केला तेव्हा हिंदुस्थानातील शेतकरी निरक्षर, आळशी आणि व्यसनी आहे शिवाय लग्नप्रसंगी वगैरे अनावश्यक प्रचंड खर्च करतो म्हणून हिंदुस्थानातील शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी आहे असे हिंदुस्थानासहित युरोपातील शेती संबंधातील सर्व पुस्तके सांगत होती. सर्व अर्थशास्त्र्यांमध्ये अशा तर्‍हेच्या कुभांड रचणार्‍या विचारांना मान्यता होती. अशा कुभांडी विचारांना खोडून काढण्याचे ऐतिहासिक कार्य माझ्या हातून घडले, हे विनम्रतेने मी मान्य करतो.

                शेतकरी संघटनेच्या प्रारंभीच्या काळात मी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जात असे आणि नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे हे सर्व संकट भारतावर कोसळले आहे असे सांगत असे. शेतीचे शोषण केल्याखेरीज समाजवादी उद्योगधंद्याचे पोषण होणार नाही अशी समाजवादी विचारसरणी बाळगून पंडित नेहरू असमतोलाच्या दिडदांडी तराजूच्या आधाराने औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीतील कच्च्या मालाचे शोषण करीत आहे, असे मी त्यावेळी सांगत असे आणि शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी विकासाचा व गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, असे मी फार आग्रहाने मांडत असे.

                जपानी लोकांमध्ये खूप देशभक्ती आहे म्हणून जपानी लोक श्रीमंती आणि वैभवाकडे गेलेले नाहीत तर १९२१ सालापासून जपानमध्ये तयार होणार्‍या भाताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणार्‍या भावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळत आहे. त्यामुळेच तेथील शेतकर्‍यांच्या हातात पैसे आले आणि त्यातूनच तेथील शेतकर्‍यांनी छोटेछोटे गृहउद्योग सुरू केलेत. नंतर त्या गृहउद्योगात तयार झालेल्या वस्तूंच्या जोडणीचे कारखाने सुरू झालेत आणि त्यातूनच त्या देशाचा औद्योगिक विकास झाला. आजही जपानमध्ये टोयाटोसारखे मोठमोठे कारखाने गावात पाहायला मिळतात. कारखानदारीच्या विकासाकरिता जपान्यांना कधी शहराकडे धाव घेण्याची गरज पडली नाही. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे जपानमध्ये अगदी १९२१ सालापासूनच मान्य करण्यात आले. नंतर चीननेही अशाच तर्‍हेच्या धोरणांचा अंगिकार केला; मात्र पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात शेतीचे मरण ठरेल अशाच तर्‍हेचे धोरण आखल्या गेले. शेतीमालाला रास्त भाव मिळताच कामा नये, अशा तर्‍हेचे अधिकृत धोरण पंडित नेहरूंनी राबविले. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या दस्तावेजात आजही याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत.

                अशा तर्‍हेचे धोरण राबविल्या गेल्यामुळेच शेतमालाला रास्त भाव मिळाला नाही आणि शेतकरी कर्जात बुडाला. आज देशात शेतकरी आत्महत्या होत आहे त्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या कापूस उत्पादक क्षेत्रात जास्त आहे कारण शेतमालाचा विचार करता सगळ्यात जास्त लूट कापूस या पिकाची झाली आहे. जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव २१० रुपये असतील तर हिंदुस्थानात कापसाला कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया १०० रुपयापेक्षा जास्त भाव दिले नाही. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे कापूस एकाधिकार योजनेखालीच कापसाची खरेदी होत असल्याने विदर्भातील शेतकर्‍यांना ६० रुपयाच्या वर कधीच भाव मिळाले नाहीत. जगाच्या बाजारपेठेत २१० रु. भाव असताना विदर्भात कापसाला केवळ ६० रुपयेच मिळाल्याने विदर्भातील शेतकर्‍यांवर आत्महत्येचे संकट ओढवले आहे. आतापर्यंत एक लक्ष साठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. याला वंशविच्छेद असा शब्द वापरता येईल. असा वंशविच्छेद होऊनही अजूनपर्यंत शहरातील कोणत्याही माणसात याविषयी थोडीसुद्धा कणव निर्माण झाली नाही. याविषयी आपले काहीतरी चुकत असावे, आपण विचार करायला हवा.

                गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यासाठी ग्रामीण महिलांना काही किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागर घेऊन पाणी आणावे लागते, हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही गावाच्या मध्यभागी एक हौद बांधावा आणि त्यात मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी आणून सोडावे, जेणेकरून महिलांचे जगणे सुसह्य होईल, असा विचार करून कामाला लागलो तेव्हा त्याच गावातील एक म्हातारी आजीबाई येऊन माझ्या बायकोला म्हणाली की, बाई तुम्ही सर्व करा पण पाण्यासाठी गावात हौद बांधू नका कारण सध्या सासुरवाशीण मुलींना आपसातले दु:ख एकमेकींजवळ व्यक्त करायला निदान पाणवठा ही एकतरी जागा उपलब्ध आहे. तुम्ही जर हौद बांधला तर त्यांची आपसातील दु:ख व्यक्त करण्याची एकमेव जागाही कायमची बंद होईल.

                मी शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळायला हवे, अशी मांडणी केली तेव्हा सुरुवातीला खूप वादविवाद झालेत. उत्पादन खर्च कुणी व कसा काढायचा याविषयीही उहापोह झाला तेव्हा शेतीमध्ये जे उर्वरक, बियाणे, कीटनाशके लागतात त्याचा एक इंडेक्स तयार करावा असे काहींनी मांडले. मला मात्र शेतीमालाचा उत्पादनखर्च सरकारी यंत्रणांनी काढावा, हे अजिबात पटत नाही कारण शेतमालाला रास्त भाव न मिळण्यात सरकार हाच सर्वात मोठा अडसर आहे. सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है।

                कोणत्याही बाजारपेठेमध्ये जर पूर्णपणे खुली व्यवस्था असेल आणि त्यात अनावश्यक सरकारी लुडबुड नसेल, केव्हाही शेतमालाची निर्यातबंदी करायची, वाटेल तेव्हा आयात करून शेतमालाचे भाव पाडायचे, अशा तर्‍हेचे उपद्व्याप जर सरकारने केले नाहीत आणि त्याच बरोबर शेतमालाच्या प्रक्रियेवरती, वाहतुकीवरती जर सरकारने बंधने लादली नाहीत तर या व्यवस्थेत मिळणारी किंमत शेतकर्‍यांना मान्य होण्यासारखीच असेल याची मला खात्री आहे.

                डॉ. अरुण टीकेकर यांचे अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीचे कामकाज पाहिले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरस्कार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला होता.

                'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान सोहळ्याला डॉ. अरुण टिकेकर, श्री अनंत दीक्षित, डॉ. द.ना. धनगरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री सुधीर जोगळेकर, श्री अविनाश धर्माधिकारी, सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र बेडेकर यांनी तर मानपत्र वाचन श्री तुषार दळवी यांनी केले.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर जोगळेकर, गौरवपर भाषण श्री अनंत दीक्षित, अध्यक्षीय भाषण डॉ. अरुण टिकेकर तर समारोपीय आभार प्रदर्शन श्री विद्याधर नेमकर यांनी केले.

                                                                                                                   - गंगाधर मुटे
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(छायाचित्र श्री अरुण दातार यांच्या सौजन्याने) 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------