नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठीशरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश

श्री. शरद जोशी यांच्या तब्येतीविषयी

       श्री. शरद जोशी यांच्या उजव्या खांद्यावर ७ मार्च २०१४ रोजी खांद्यातील खुब्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची तब्येत दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्या देखरेखीखाली सुधारत आहे.

      साधारण तीनचार महिन्यांपूर्वी उजवा हात वर उचलताना खांद्यात वेदना होत असल्याची तक्रार सुरू झाल्याने अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभय कुलकर्णी यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. त्या तपासणीत उजव्या दंडातील स्नायू खुब्याजवळ कधीतरी फार पूर्वी दुखावला गेला असणार आणि हळूहळू तो अधिकाधिक कमकुवत गेल्याचे, तसेच त्यामुळे खुब्याचे हाड सरकल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
      श्री. शरद जोशींवर हृदयासंबंधी आजारावर नियमित उपचार करणारे डॉ. दुराई राज यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हृदयाच्या सध्याच्या अवस्थेत शस्त्रक्रिया झेपणे कठीण असल्याचे मत देऊन इतर औषधोपचार सुरू करण्याचा सल्ला दिला. औषधोपचारांचा उपयोग होत होता पण खांद्याचे दुखणे मधूनमधून उचल खात होते. पुन्हा एकदा डॉ. कुलकर्णींनी तपासणी केली आणि शस्त्रक्रिया न करता त्या हाताचा वापर चालूच ठेवला तर लवकरच तो हात पूर्ण निकामी होण्याचीच शक्यता जास्त असल्याचे मत त्यांनी दिले. त्यामुळे डॉ. कुलकर्णी आणि डॉ. दुराई राज यांच्यामध्ये यासंबंधी सविस्तर चर्चा होऊन शक्य तितकी काळजी घेत, शरद जोशींच्या इच्छेनुसार, ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद जोशींना, त्यांच्या दोन्ही मुलींना त्याची कल्पना देऊन, ४ मार्च २०१४ रोजी रुबी हॉल नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले.

      ७ मार्चपर्यंत ऑपरेशनच्या दृष्टीने सर्व पूर्वतपासण्या तसेच हृदयाच्या दृष्टीने धोका कमीत कमी करण्यासाठी औषधोपचार झाल्यानंतर ७ मार्चला सकाळी ८ वाजता शरद जोशींना ऑपरेशन थिएटरमध्ये डॉ. कुलकर्णी, त्यांचे सहकारी आणि भूलतज्ज्ञ यांच्या हवाली करण्यात आले. डॉक्टरांनी ऑपरेशन ९९ टक्के यशस्वी होईल याची खात्री दिली पण १ टक्का धोक्याचीही तयारी ठेवा असे सांगितले. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना शरद जोशींना सौ. सरोज काशीकर, दर्शिनी भट्टजी, अनंत देशपांडे आणि समीर ड्रायव्हर यांनी शुभेच्छापूर्वक निरोप दिला. ऑपरेशनला साधारण दोन अडीच तास लागतील असे डॉक्टरांनी सांगितले.
तीन तास उलटून गेले तरी बाहेर काही माहिती येईना, सगळ्यांची मनस्थिती तंग झाली होती आणि खूप उशिरा म्हणजे दुपारी साडेतीन वाजता डॉक्टरांनी बाहेर येत ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले. धोका टाळण्यासाठी जय्यत तयारी करण्याच्या खटाटोपात ऑपरेशन सुरू व्हायलाच खूप उशीर झाला हे बाहेर प्रतीक्षा करणारांना नंतर कळले.

      ऑपरेशनसाठी दिलेल्या भुलीचा असर कमी झाल्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास शरद जोशींना अतिदक्षता विभागाच्या कक्षामध्ये हलविण्यात आले. ती रात्र शुद्धीबेशुद्धीच्या सीमेवर असलेल्या शरद जोशींसाठी मोठी कठीण गेली. श्री. अनंत देशपांडे रात्रभर त्यांच्यासोबत होते. ८ मार्चला श्री. गोविंद जोशी आमच्या मदतीला आले. १२ मार्चपर्यंत अतिदक्षता विभागातील मुक्कामानंतर १३ मार्च रोजी शरद जोशींना साध्या कक्षामध्ये आणण्यात आले. तेथे ऑपरेशननंतरच्या सर्व तपासण्या व उपचार सुरू झाले. दोन्ही डॉक्टर आणि त्यांच्या सहाय्यकांची देखरेख सतत चालू होती.

      १७ मार्चला शरद जोशींना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले, पण उजवा हात अजूनही बांधलेल्या अवस्थेतच होता. २७ मार्च रोजी डॉ. कुलकर्णी यांनी टाके वाळल्याची खात्री करून घेऊन ते काढून टाकले. हाताचे काम सुरळीत चालू होण्यासाठी अजून दोनेक महिन्यांचा अवधी लागेल असे डॉक्टरांचे मत आहे; तोपर्यंत उजव्या हाताच्या हालचालीवर मर्यादाच रहाणार आहेत.

     ३१ मार्च रोजी पुन्हा एक्सरे काढून डॉक्टरांनी तपासणी केली व झालेल्या सुधारणेबद्द्ल समाधान व्यक्त केले. तरीही अजून किमान दोन महिने लांबचा प्रवास टाळावा असा त्यांनी सल्ला दिला आहे. तोपर्यंत, खांद्याची फार हालचाल होऊ नये म्हणून व्यायामाचा व जेवण्याचा काळ वगळता, हात गळ्यातच बांधून ठेवावा लागणार आहे.

      नेमक्या याच कालावधीत महाराष्ट्रातील गारपिटीच्या आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येऊ लागल्या. या संकटकाळात शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी, मनात तीव्र इच्छा असूनही, आपल्याला जाता येत नाही याची शरद जोशींच्या मनाला मोठी रुखरुख लागून राहिली आहे. सरकारने कितीही मदत केली तरी ती फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करण्यासारखीच असेल. शेतकर्‍यांनी या संकटाला धीराने तोंड देऊन आपली व आपल्या कुटुंबियांची हिम्मत बांधून ठेवावी अशी त्यांची विनंती आहे. डॉक्टरांची परवानगी मिळताच ते शेतकर्‍यांना भेटायला येण्यास उत्सुक आहेत तोवर हिम्मत हरू नका असा त्यांचा शेतकर्‍यांना निरोप आहे.

                                       
                                                                                                               - सुरेशचंद्र म्हात्रे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शरद जोशी

......... आणि यामुळे मा. शरद जोशी विदर्भ-मराठवाड्यातील गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटीला येऊ शकले नाही. 
 शेतकर्‍यांचा सुर्य आता शरिराने थकला आहे. 
 त्यांना अखंड निरामय स्वास्थ्य लाभावे, हीच प्रभूचरणी प्रार्थना!

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/04/2014 - 17:29. वाजता प्रकाशित केले.

    हा आहे आजचा फोटो. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

    Operation