नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.
९ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन (Online)
दिनांक : दि. ०३ सप्टेंबर २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२  
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking)
नोंदणीची अंतिम तिथी : १५ ऑगष्ट २०२२
 प्रतिनिधी सहभाग निधी : निधी इच्छेनुसार पण अनिवार्य

संमेलनाविषयी माहिती 
https://www.baliraja.com/node/2555

प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती  
https://www.baliraja.com/rep-regd

भागधारक व्हा! लाभधारक व्हा!!
अधिक माहितीसाठी



२५ वर्षांपूर्वीचा जळगाव येथील एकत्र जयंती उत्सव,शेतकरी संघटनेचे कार्ये आणि गरज: एक दृष्टीक्षेप

गावांच्या वेशीच्या आतल्यांनी छत्रपति शिवाजी महाराज तर गावांच्या वेशीच्या बाहेरच्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आमचेच म्हणून जेव्हा त्यांच्या जयंत्या साजर्‍या केल्या जात होत्या आणि त्यांच्या नावाचा वापर करून व समाजात तेढ निर्माण करून मुंबईपासून ते राज्यातील खेड्यापाड्यांपर्यंत जेंव्हा राजकारण केले जात होते, तेंव्हा द्देशात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १८ एप्रिल, १९८८ रोजी एकत्रित साजरी करण्याचा विचार मांडून तो कार्यक्रम मा. श्री शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या जळगाव येथील सभेत प्रचंड मोठ्या जनसागरासमोर करून या दोन्ही महापुरुषांची महानता जगाला दाखवून दिली होती आणि त्यावेळी इलेक्ट्रोनिक प्रसारमाध्यमांचा फारसा गवगवा नसतानाही या घटनेची फक्त देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील माध्यमांनी दखल घेतली होती.या घटनेचा मीही जळगावात साक्षीदार होतो.

या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यावेळी जातीपातीच्या विचार सोडून शेतकरी हे श्री शरद जोशी यांना तारणहार समजत होते व त्यांच्या इशार्‍यावर अगदी लाखोंच्या संख्येने आंदोलनात भाग घेत होते. पोलिसांच्या काठ्यांचा विचार न करता रस्त्यांवर उतरत होते. तेंव्हा श्री शरद पवार यांचा समाजवादी कॉंग्रेस हा पक्ष होता. शेतक-यांचा प्रश्नांची सोडवणूक करू या आश्वासनावर श्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या पुलोदला शेतकरी संघटनेने पाठींबा दिल्याने १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक विधानसभा जागांवर कॉंग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला होता आणि तत्कालीन पुलोद आघाडीला अत्यंत चांगले यश मिळाले होते. या यशात शेतकरी संघटनेचा पुलोदला असलेला पाठींबा, हा अत्यंत महत्वाचा घटक होता.

सर्व शेतकर्‍यांच्या शेतीमालाला "उत्पादन खर्चावर आधारित भाव" मिळालाच पाहिजे, हि खरी शेतकर्‍यांची मागणी असून प्रथम श्री.शरद जोशी यांनी संघटना उभी करून हि मागणी केली. राजकारण करणार नाही म्हणणारे शरद जोशी यांनी महाराष्ट्रात श्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप, जनता पार्टी, शेकाप व समाजवादी कॉंग्रेस यांच्या - "पुलोद" ला पाठींबा देवून संघटनेच्या सर्व शक्तीनिशी मदत केल्याने महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण भागात सुद्धा भाजपला त्यांचे आमदार निवडून आणून पाय रोवता आलेत. त्याचाच उपयोग पुढे भाजपला राज्यात व केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी झाला. अशाप्रकारे भाजपच्या महाराष्ट्रातील विस्ताराचे श्रेय हे श्री शरद जोशी आणि श्री शरद पवार यांना जाते, हे सामान्यांना फारसे माहित आणि कळत नसले, तरी राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक यांना हे चांगले माहित आहे.

श्री शरद पवार हे पुलोदला विधानसभेत बहुमत व राज्यात सत्ता न मिळाल्याने पुढे कॉंग्रेस मध्ये गेले आणि मुख्यमंत्री झालेत. थोडक्यात,श्री शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेमुळे शेतकर्‍यांचा किती फायदा झाला हा जरी चर्चेचा विषय असला, तरी शेतकरी संघटनेचा मात्र महाराष्ट्रात कॉंग्रेस विरोधी राजकारणाला आणि त्यातही स्वतः श्री शरद पवार आणि भाजप यांना निश्चितच मोठा फायदा झाला, हा इतिहास आहे.

शेतकरी संघटनेच्या नेत्यांना काही सहकारी साखर कारखाने, पंचायत समित्या, बाजार समित्या यांच्या सत्ताही मिळाल्यात. मात्र, त्यांच्या शेतक-यांना किती फायदा झाला पुन्हा संशोधनाचा व चर्चेचा विषय होवू शकतो. मात्र, यामुळे शेतकर्‍यांना फारसा फायदा झाला नसेल तर तो शेतकरी संघटनेचा अथवा श्री शरद जोशी यांच्या विचारांचा नव्हे तर त्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाचाच दोष होता, असेच म्हणावे लागेल.

नाशिक जिल्ह्यातील सर्वच विधानसभा जागांवर कॉंग्रेसला पराभाव पत्करावा लागला तर श्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद व विरोधी पक्षांना नाशिक जिल्ह्यात मोठे यश मिळाले होते. त्यात प्रचंड मोठा वाटा हा शेतकरी संघटनेचा व श्री शरद जोशी यांचा होता.

"भारत" आणि " इंडिया" या संकल्पना देशात सर्वप्रथम श्री शरद जोशी यांनी देवून याच देशातील "इंडिया" आणि "भारत" वाले यांच्या जीवनमानातील प्रचंड मोठी आर्थिक दरी कमी करण्यासाठी शेतकर्‍यांची संघटना बांधून अत्यंत कसोटीने प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर अनेक सामाजिक समस्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केलेत. त्याचाच एक भाग म्हणजे चांदवडचे महिला अधिवेशन आणि जळगाव येथील एकत्रित जयंती उत्सव हे होत.

इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमे फारसी नसतानाही एकवेळ संपूर्ण देशाने शेतकरी संघटनेच्या आंदोलनांची आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यक्रमांची दाखल घेतली होती. त्यातील एक म्हणजे जातीयतेचे अगदी खेड्यापाड्यांत पसरलेले व पसरविले जाणारे विष कमी करून समाजात सुसंवाद निर्माण करण्यासाठी साजरी केलेली छत्रपति शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर दुसरे म्हणजे चांदवड येथील महिला अधिवेशन. या दोन्हीही कार्यक्रमांतून शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रश्नांबरोबरच संपूर्ण समाजातील अत्यंत महत्वाच्या अशा सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून त्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाचे कायदे पास करून घेण्यासाठी शेतकरी संघटनेने केलेले प्रयत्न हे अत्यंत महत्वाचे आहेत. ग्रामीण भागातील दारूची दुकाने बंद करण्याबाबतच्या कायद्याचा यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

महाराष्ट्रात अत्यंत ताकदवान असलेल्या श्री शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे अस्तित्व बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अनेक जिल्ह्यांतून आता नामशेष होण्याच्या मार्गावर आलेले दिसते, याचा अर्थ शेतकर्‍यांचे प्रश्न पुरते संपले असा निश्चितच नाही. किंबहुना, शेतक-यांचे आणि ग्रामीणच नव्हे तर शहरी भागांचेही प्रश्न हे पूर्वी पेक्षा अधिक उग्र रूप धारण करून पुढे येत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसते आहे. ग्रामीण भागातील जनतेचा शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात आणि वाढत्या वेगाने होणारे स्थलांतर आणि त्यातून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीही भागात अनेक नवीन प्रश्न आणि समस्या निर्माण करणारे आहेत.

राजकीय क्षेत्रावर सध्या शहरी भागाचा निर्माण होत चाललेला वरचष्मा आणि ग्रामीण नेतृत्वाला लागलेली ओहोटी ही यापुढील कालावधीत अनेक सामाजीक, आर्थिक आणि राजकीय प्रश्न निर्माण करणारी ठरणार आहे. राज्यातील सरकारे ही ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांचा अधिक विचार करणारी व ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक दुर्लक्ष करणारी होत चालली असून त्यामुळे भविष्यातील महाराष्ट्र हा फक्त शहरांतील सत्ताधार्‍यांचाच महाराष्ट्र होण्याचा मोठा धोका निर्माण होणार आहे.

शहरी भागांतील गुन्हेगारी शहरी राजकारण्यांबरोबर अगदी ग्रामीण भागापर्यंत पोचत आहे.

शेतकर्‍यांनी त्याच्या जमिनी देवून व भाग-भांडवल जमा करून सहकारी क्षेत्रात सुरु केलेले अनेक साखर कारखान्यांची मालकी आज राजकारणी आणि उद्योगपतींच्या हातात गेली आहे.

एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा असतांना पुन्हा कांद्याच्या व इतर शेती मालांच्या भावाचा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकर्‍यांच्या समस्या पूर्वीपेक्षा अधिक उग्र रूप धारण करून उभ्या आहेत. अनेक उद्योगांचा, व्यापाराचा, वाहतुकीचा आणि शेवटी या देशाचा, या देशातील मोठ्या प्रमाणातील बुद्धीजीवी व राजकारणी मंडळी या सर्वांचा पाया असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हा आजही दारिद्र्य व कर्जाच्या खाईत अडकला असून त्याला कोणीही खरी मदत करण्यास पुढे येत नाही, ही वास्तवता आहे.

मी स्वतः वकिली व शेती करून त्याचा अनुभव घेत आहे

गेल्या पंचवीस वर्षात देशातील व राज्यातील बदललेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितही देशाला अजूनही शेतकर्‍यांच्या आणि ग्रामीण भागाच्या समस्यांची तड लावून त्या समस्या सोडवून घेण्यासाठी सशक्त अशा संघटनेची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी श्री शरद जोशी यांनी गेल्या पंचवीस वर्षात संघटनेपासून दूर गेलेले जुने जाणते कार्यकर्ते व नेते होते त्यांना पुन्हा एकदा सोबतीला घेवून राज्याच्या ग्रामीण भागात दौरा करून व जुन्यांच्या मदतीने नव्यांना एकत्र करून पुन्हा एकदा संघटनेला बळकटी आणून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी अनेक शेतकर्‍यांची व अभ्यासकांची अपेक्षा आहे. श्री राजू शेट्टी यांच्या नेतृवाखाली जी संघटना आहे त्यांनीही एकत्र येवुन काम केले तर शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. याबाबत अनेक जुने नेते व कार्यकर्ते भेटले कि त्यांची ही अपेक्षा ते बोलून दाखवितात.

(मी अगदी शालेय जीवनापासून शेतकरी संघटनेच्या कार्यात सहभागी आहे. शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी मी स्वतः शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून २१ ते २३ एप्रिल,१९८९ या कालावधीत इतर काही कार्यकर्त्यांसोबत लासलगाव,जिल्हा नाशिक येथे उपोषण केले व त्याची सांगता हि श्री शरद जोशी यांच्या हस्ते दिनांक २३.०४.१९८९ रोजी झाली. आज त्यालाही २४ वर्षे झाली आहेत. मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही).

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 24/04/2013 - 16:04. वाजता प्रकाशित केले.

    अतिशय मुद्देसूद व शेतकरी संघटनेच्या गतकाळात डोकावून परिस्थितीचे विश्लेषण करणारा लेख.
    आवडला.

  • अँड.विलास देशमाने's picture
    अँड.विलास देशमाने
    बुध, 24/04/2013 - 16:29. वाजता प्रकाशित केले.

    सर, कालच आमच्या उपोषणाची सांगता होवून २४ व्रशांचा कालावधी झाला आणि आज २५ व्या वर्षाला सुरुवूत होत असताना आजच आपण मला शेतकरी संघटनेविषयी येथे लेख लिहिण्याची सूचना केली. तसा हा योगायोगच ! आपण सुचविल्याप्रमाणे मी वरील लेख येथे लिहिला आहे.

    त्यावरील आपल्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. धन्यवाद!

    विलास देशमाने

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 24/04/2013 - 16:24. वाजता प्रकाशित केले.

    अरेव्वा..! उपोषणाच्या सांगता दिवसाचा आज गोड उजाळा झाला.

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    बुध, 24/04/2013 - 16:27. वाजता प्रकाशित केले.

    या संकेतस्थळाचे अजून खूप काम बाकी आहे. भरपूर मजकूर पोस्ट करायचा आहे. कोणी मदतीला नाही. तुमच्यासारखी अजून काही मित्रमंडळी या कामास मिळाली तर फार मोठे काम आपण करू शकू.

  • अँड.विलास देशमाने's picture
    अँड.विलास देशमाने
    बुध, 24/04/2013 - 16:33. वाजता प्रकाशित केले.

    यासाठी माझेकडून शक्य ती जास्तीत जास्त मदत दिली जाईल, धन्यवाद !

    विलास देशमाने