लासलगाव रेल्वे रोको आंदोलन
कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्यांचे काम नाहीच पण;
आसुड उगारणारा माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने
असे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.
तत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.
लासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अॅड दिनेश शर्मा, अॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
आंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
कांदा उत्पादक शेतकर्यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
या रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.
गंगाधर मुटे
महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश
------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रवृत्तांत :
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
------------------------------------------------------------------------------------------------------------
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन - प्रचंड पोलिस बंदोबस्त
------------------------------------------------------------------------------------------------------------
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन - शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले
------------------------------------------------------------------------------------------------------------
शिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना
------------------------------------------------------------------------------------------------------------
आंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी
------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना
------------------------------------------------------------------------------------------------------------
आंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग
------------------------------------------------------------------------------------------------------------
उपस्थित विराट आंदोलकसमुदाय
------------------------------------------------------------------------------------------------------------
कानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक
------------------------------------------------------------------------------------------------------------