शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७

स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४

शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.

चांगले दिवस येतील म्हणून शेतकर्‍यांनी सत्ताबदल करुन पाहिला पण शेतकर्‍यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. सारेच पक्ष शेतकरीविरोधी असल्याची भावना शेतकर्‍यांत बळावू लागल्याने आता थेट बापूंनाच साकडे घालून तूच शेतकर्‍यांना आणि पर्यायाने या देशाला वाचव, अशी प्रार्थना करण्याशिवाय अन्य पर्यायच शेतकर्‍यांसमोर उरलेला नाही.

बापूंच्या स्वप्नातले ग्रामसुराज्य, संपूर्ण शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमुक्तीचे शरद जोशी यांचे अधूरे स्वप्न, तूट नसतानाही आयात व मुबलकता असतानाही निर्यातबंदी, पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वीज, मागेल त्याला तात्काळ नवीन वीजजोडणी, वीजबिलातून शेतकर्‍यांची सरसकट वीज बील मुक्ती इत्यादी शेतीसमस्यांकडे बापूंनी लक्ष पुरवून सत्ताधार्‍यांना सदबुद्धी द्यावी, असे बापूचरणी आर्जव करण्यात येणार आहे.

उच्चशिक्षितांची वाढती बेरोजगारी लक्षात घेता शेती व्यवसायातूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची अमंलबजावणी करणे काळाची गरज आहे तसेच शेतकर्‍यांना संपत्ती बाळगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाची पुनर्स्थापणा करण्याचीही गरज आहे. शेतीप्रश्नावर असंवेदनशील असलेल्या सरकारच्या संवेदना जाग्या करण्यासाठी देशव्यापी तुतारी फ़ुंकण्याकरिता दुपारी १ ते ४ पर्यंत चालणार्‍या या महात्माजींना साकडे आंदोलनात राज्यभरातून शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच देशभरातील किसान समन्वय समितीचे सदस्य हजर राहून बापूंच्या चरणावर शेतकर्‍यांचे आर्त अर्पण करणार आहेत.

साकडे आंदोलनाला सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

- गंगाधर मुटे
शेतकरी संघटना, वर्धा
~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया

Punynagari

Sakal